Manipur News : पंतप्रधान मोदींनी मणिपूरला तातडीने भेट द्यावी ! इंडिया आघाडीचे आवाहन

नवी दिल्ली – हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील स्थितीवरून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने सोमवारी दिल्लीतील जंतर-मंतर भागात निदर्शने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने मणिपूरला भेट द्यावी, असे आवाहन निदर्शनांवेळी करण्यात आले.
मणिपूरमध्ये लवकरात लवकर शांतता आणि सुरळितता प्रस्थापित व्हावी या प्रमुख मागणीसाठी इंडिया आघाडीने धरणे धरले. त्यामध्ये कॉंग्रेस, माकप, भाकप, सीपीआय (एमएल) आणि एआयएफबी या पक्षांचे राष्ट्रीय आणि मणिपूरमधील नेते सहभागी झाले.
त्यामध्ये प्रामुख्याने जयराम रमेश, शशी थरूर, प्रकाश कारत, डी.राजा आणि मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओ.इबोबी सिंह यांचा समावेश होता. मणिपूरमधील मागील १९ महिन्यांतील स्थिती पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही.
त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. तसेच, मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांना हटवले जावे, अशा मागण्या निदर्शनांवेळी करण्यात आल्या. मणिपूरमध्ये मागील वर्षीच्या मेमध्ये वांशिक संघर्षाची ठिणगी पडली.
त्यानंतर त्या राज्यात हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. त्यामध्ये आतापर्यंत २५० हून अधिक जण मृत्युमुखी पडले. त्याशिवाय, मोठ्या संख्येने लोक विस्थापित झाले. त्या राज्यातील स्थिती अजूनही पूर्वपदावर आलेली नाही.





