#Manipur Election 2022: मणिपूरची संस्कृती, भाषा, इतिहासाचे कॉंग्रेस रक्षण करेल

इम्फाळ – भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मणिपूरचा इतिहास, संस्कृती आणि भाषेचे महत्त्व कमी केले आहे. मात्र, या संस्कृतीचे कॉंग्रेस रक्षण करेल, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
मणिपूरच्या महिलांना एकतृतीयांश आरक्षण दिले जाईल. राज्यातील लघू-मध्यम-सूक्ष्म उद्योगाचे पुनरुजीवन केले जाईल. तांदळाच्या उत्पादनामध्ये राज्य आत्मनिर्भर केले जाईल. सिंचनाच्या सुविधा अधिक चांगल्या केल्या जातील, फूडपार्क उभारले जातील आणि महिलांकडून नियंत्रित केल्या जाणाऱ्या इमा मार्केटची उभारणी केली जाईल, असे आश्वासनही राहुल गांधी यांनी इम्फाळमध्ये झालेल्या प्रचार सभेमध्ये दिले.
संघ आणि भाजप मणिपूरमध्ये अहंगंडाच्या भावनेतून आले आहेत. मात्र, मी मणिपूरच्या दऱ्या, डोंगर आणि वैविध्यातून मानवता शिकण्यासाठी आलो आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
देशातील प्रत्येक राज्याला आपली स्वतंत्र भाषा, संस्कृती, इतिहास आणि स्वतःकडे पाहण्याचा स्वतंत्र हक्क आहे. मात्र, भाजप एक भाषा, एक संस्कृती आणि एकाच विचारधारेवर विश्वास ठेवतो. भारतात या दोन भिन्न विचारधारेंची लढाई सुरू आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
अमित शहा यांनी मणिपूरच्या काही नेत्यांना आपल्या घरी बोलावले होते. मात्र, त्यांना पादत्राणे बाहेरच काढण्यास सांगण्यात आले होते. अशा प्रकारे पाहुण्यांचा अनादर करणे ही आमची संस्कृती नाही, असेही गांधी यांनी सांगितले





