Manikrao Kokate : साडेसातीच्या संकटात सापडलेले माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी; राजीनाम्याच्या चर्चेत मंदिरात पूजा-अर्चना

नंदुरबार : राज्याचे कृषिमंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधकांच्या आरोपांची साडेसाती लागल्याने ते आता शनिदेवाच्या शरणी गेले आहेत. नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी शनिमांडळ येथील देशातील एकमेव साडेसाती मुक्त शनि मंदिरात दर्शन घेतले आणि विधिवत पूजा-अर्चना केली.
शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि विधान परिषदेत ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे कोकाटे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र केली असून, मंगळवारी (२९ जुलै) याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर, कोकाटे यांनी शनिमांडळ मंदिरात अभिषेक आणि पूजा करून विरोधकांच्या आरोपांपासून मुक्ती आणि राजकीय संकट टाळण्यासाठी शनिदेवाला साकडे घातले आहे.
कोकाटे यांचा विधान परिषदेत रमी खेळतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी शेअर केल्यानंतर हा वाद पेटला. त्यानंतर कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची सफाई देताना राज्य सरकारलाच “भिकारी” संबोधल्याने नवीन वाद निर्माण झाला. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी कोकाटे यांच्या वक्तव्याला “असंवेदनशील” ठरवत त्यांच्या तात्काळ बरखास्तीची मागणी केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे संजय राऊत यांनीही कोकाटे यांचा समावेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हटवण्याची मागणी केलेल्या चार मंत्र्यांमध्ये असल्याचा दावा केला. याशिवाय, छावा संघटनेने कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि कारवाईची मागणी केली.
शनिमांडळ मंदिरातील पूजा
शनिमांडळ येथील शनि मंदिर हे साडेसातीपासून मुक्ती देणारे एकमेव स्थान म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. भाविकांच्या श्रद्धेनुसार, शनिवारी येथे शनिदेवाची पूजा केल्यास आयुष्यातील संकटे आणि “इडा-पिडा” दूर होतात. कोकाटे यांनी या मंदिरात शनिदेवाचा अभिषेक आणि पूजा-अर्चना करून विरोधकांच्या आरोपांपासून सुटका मिळावी आणि मंत्रिपदावरील संकट टळावे यासाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठीही प्रार्थना केल्याचे सांगितले.
रोहित पवारांचा ट्विटवरून टोला
राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांच्या शनिमांडळ भेटीवर ट्विटद्वारे खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले, “तुम्ही चुका करा, मी तुमच्या पाठीशी आहे, असं शनिमहाराज कधीच सांगत नाहीत. स्वार्थासाठी मंत्र्यांनी कितीही तेलाचा अभिषेक केला, तरी शेतकऱ्यांच्या आणि मागासवर्गीयांच्या पिडेला जबाबदार असणाऱ्यांना शनिदेव दूर करो, अशी मी प्रार्थना करतो.” या ट्विटमुळे कोकाटे यांच्यावरील राजकीय दबाव आणखी वाढला आहे.





