Sanjay Raut : संजय राऊतांनी सरन्यायाधीशांना पाठवली ‘नरकातला स्वर्ग’ची प्रत

मुंबई : महाराष्ट्रात ईडीच्या माध्यमातून जी राजकीय सुडाची प्रकरणे घडविण्यात आली, त्याचा मी स्वत: एक बळी आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यांनाही सूडचक्राच्या दमन चक्रातून जावे लागले. मी स्वत: शंभर दिवसांपेक्षा जास्त तुरुंगात राहिलो आणि ईडीचा छळ सहन केला. ईडीचे अघोरी कारनामे व तुरुंगातील अनुभवावर नरकातला स्वर्ग हे माझे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्या पुस्तकाची प्रत आपल्या अवलोकनार्थ पाठवीत आहे, असे खासदार संजय राऊत यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
गेल्या काही वर्षात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) विरोधकांवर कारवाई करण्यात आली आहे. विरोधकांवर कारवाई करण्यासाठी भाजपकडून ईडीचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप वारंवार केला जातो. याप्रकरणी आता ईडीचे अधिकारी सर्व मर्यादांचे उल्लंघन करत असून या यंत्रणेचा राजकीय लढाईमध्ये वापर केला जात आहे, अशा परखड शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. याचपार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी त्यांच्या या पुस्तकाची प्रत सरन्यायाधीश भूषण गवई यांना पाठवली आहे.
संजय राऊत यांनी पत्रात म्हटले की, ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा मनमानी पद्धतीने व सूडबुद्धीने काम करीत आहेत. त्यात अनेकजण नाहक बळी गेले. ईडीने राजकीय हत्यार म्हणून स्वत:चा वापर होऊ देऊ नये, असे कडक निरीक्षण आपण अलीकडेच नोंदवले. याबाबत आपण महाराष्ट्रातील घडामोडींचा संदर्भ दिलात, त्याबद्दल देशभरातील लोकशाहीप्रेमी जनता आपली आभारी राहील, असे त्यांनी म्हटले.





