Vijay Wadettiwar : मंगेशकर कुटुंब लुटारुंची टोळी, माणुसकीला लागलेला कलंक; विजय वडेट्टीवार संतापले

मुंबई : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय तनिषा भिसे नामक गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी वादात सापडले आहे. या रुग्णालयावर गंभीर स्थिती रुग्णालयात आलेल्या तनिषा यांच्या कुटुंबीयांकडे प्रसूतिसाठी तब्बल १० लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर हल्लबोल केला आहे.
मंगेशकर कुटुंब ही लुटारुंची टोळी आहे. मंगेशकर कुटुंब म्हणजे माणुसकीला लागलेला कलंक आहे. त्यांनी कधी कुणाला काही दान केले आहे का? खिलारे पाटलांनी त्यांना रुग्णालयासाठी जमीन दान दिली, पण त्यांनी त्यांनाही सोडले नाही, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी टीकेची झोड उठवली आहे. Mangeshkar family |
नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
विजय वडेट्टीवार म्हणाले, मंगेशकर कुटुंब ही लुटारुंची टोळी आहे. या कुटुंबाने कधी, कुठे दान करताना पाहिलं आहे का? खिलारे पाटलांनी जमीन दिली, त्या माणसाला या नालायकांनी सोडलं नाही. यांच्यात कसली माणुसकी आहे. हे तर माणुसकीला कलंक असलेलं कुटुंब आहे. अशा पद्धतीने मॅनेजमेंट चालवले जात असेल, गरिबांची लूट, शोषण केलं जात असेल तर हे कलंक आहे. यांना कोणीही साथ देऊ नये. यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी थेट मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. Vijay Wadettiwar |
शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली
महाराष्ट्र सरकार तर निर्लज्जपणाचा कळस आहे. कर्जमाफीची घोषणा करून वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये देतात, ही बेईमानी आहे. दोन वर्षांपासून मराठवाड्यातील संकटात असलेल्या शेतकऱ्यांना निधी दिला नाही. कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. ही वेळ महायुती सरकारने आणली आहे. शेतकऱ्यांची हत्या करणारे हे महायुती सरकार ठरणार आहे, अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे.





