Mandherdevi Yatra: काळूबाईच्या गडावर भक्तांचा महासागर! पण प्रशासनाच्या ‘या’ चुकीमुळे पुन्हा धोक्याची घंटा?

प्रभात वृत्तसेवा
मांढरदेव – महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काळुबाई देवीच्या मांढर गडावर आज भक्तांचा महासागर उसळलेला पाहावयास मिळाला. कडाक्याची थंडी असताना देखील आई काळूबाईचे भक्त देवीच्या दर्शनासाठी आतूर असून मांढरगडावर असंख्य गाड्या आणि भाविकांच्या गर्दीने परिसर फुलून गेला आहे. देवीच्या गाण्यांच्या तालावर देवीचा जयजयकार करत लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांमुळे मांढरगडावर भक्तांचा महासागरच उसळल्याचे चित्र अनुभवास मिळाले.
मागील आठ दिवसापासून म्हणजे 2 जानेवारी शुक्रवार पौर्णिमेपासून देवीचा वार्षिक उत्सव सुरू झाला आहे. हा उत्सव पुढे अमावस्येपर्यंत म्हणजे पौष महिना संपेपर्यंत चालतो. महाराष्ट्र तसेच परराज्यातून काळुबाई देवीला दर्शनासाठी येणार्या भक्तांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. या काळात देवीच्या दर्शनासाठी येणार्या भक्तांची संख्या लाखोंच्या घरात असते.
दि. 11 रोजी रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे मांढरगडावर देवीच्या दर्शनासाठी येणार्या भक्तांची संख्या लाखोंच्या प्रमाणात पाहावयास मिळाली. एवढ्या मोठ्या संख्येने गाड्या घेवून आलेल्या भाविकांमुळे मांढरगड फुलून गेला होता.
अनिष्ठ गोष्टींवरील पकड ढिलावली
25 जानेवारी 2005 रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी मांढरदेव येथे चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना झालेली होती.त्यामध्ये 200 ते 300 भाविकांना आपले प्राण गमवावे लागले होते.या घटनेबाबत संपूर्ण देशातून हळहळ व्यक्ती केली जात होती. त्यानंतर या घटनेची चौकशी करण्यासाठी शासनामार्फत कोचर आयोगाची स्थापना करण्यात आली होती.या आयोगाने दिलेल्या शिफारशीनुसार मांढरदेव येथे सुरू असलेल्या अनेक प्रथांना बंदी घालण्यात आली होती.
त्यामध्ये देवीला नारळ फोडणे, तेल वाहने,पशु हत्या करण्यास बंदी, ढोल ताशे व इतर वाद्य वाजवण्यास बंदी या व अशा अनेक प्रथांना बंदी करण्यात आली होती. त्यानंतरच्या यात्रांमध्ये त्याचे काटेकोरपणे पालन प्रशासनामार्फत केले जात होते.परंतु,मागिल काही वर्षांपासून या गोष्टीवरील प्रशासनाची पकड थोडी सैल होताना दिसत आहे.
बंदी असलेल्या बाबींकडे दुर्लक्ष नको
यातील बर्याच गोष्टी या वर्षी मांढरगडावर होताना पाहावयास मिळाल्या. या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या अशाच चालू राहिल्या तर भविष्यात जाऊन देखील एखाद्या मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे प्रशासनाने झालेल्या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता. यात्रेमध्ये बंदी असलेल्या या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करून येणार्या सर्व भाविकांना देवीचे दर्शन सुरक्षितपणे घेता येईल याकडे लक्ष द्यावे, असे जाणकार भाविकांमधून बोलावले जात आहे.
प्रचंड गर्दीने वाहतूक ठप्प
रविवारी मांढरगडावर भाविकांचा महापूरच लोटला होता. प्रत्येक भाविकांच्या खासगी, गाड्या, एसटी बसेस यांची संख्या वाढल्याने मांढरगडावरील पार्किग सुविधेवर ताण आला होता. प्रचंड गर्दी झाल्यामुळे भोर मार्गे येणारी वाहतूक ठप्प होऊन अतिशन संथ गतीने पुढे सरकत होती. वाहतूक कोंडी झाली तरी भाविकांच्या गाड्या त्यातून वाट काढत गडावर पोहाचत होत्या.
गर्दी व वाहनांच्या संख्येमुळे त्याचे नियोजन करताना पोलीस यंत्रणेला पळापळ करावी लागत होती. प्रशासन यात्रा कालावधीत कोणतीही असुविधा निर्माण होवू नये म्हणून प्रयत्नशील असून मांढरदेव देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत देखील यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे.





