Pimpri Chinchwad : पाण्याच्या टाकीखाली तरुण-तरुणींचा गराडा; जाधववाडीत ‘रामायण’ मैदानाजवळ नेमकं चालतंय काय?
Pimpri Chinchwad : पाण्याची टाकी आणि बैलगाडा घाट परिसरात टवाळखोरांचा वावर वाढला; जुन्या खुनाच्या घटनेची आठवण काढत स्थानिकांनी व्यक्त केली मोठी भीती.

Pimpri Chinchwad – जाधववाडी परिसरातील रामायण मैदानाजवळील पिण्याच्या पाण्याच्या टाकीखाली युवक-युवती मोठ्या प्रमाणावर एकत्र बसत असल्याचे चित्र समोर आले आहे. भर दुपारीही निर्जन ठिकाणी अशी गर्दी होत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. जाधववाडीतील पाण्याची टाकी आणि बैलगाडा घाट परिसर हे तुलनेने ओसाड व कमी वर्दळीचे भाग आहेत.
अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल आहेर यांनी वारंवार केलेली असतानाही महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी बैलगाडा घाट परिसरात एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती. तसेच सध्या या परिसरात काही व्यसनी व्यक्तींची वर्दळ वाढल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे येथे भविष्यात गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर, परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमणे, पोलीस गस्त वाढवणे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





