Mandhardevi Yatra: मांढरदेव येथे भेसळयुक्त मिठाईचा सुळसुळाट; भाविकांकडून कठोर कारवाईची मागणी

प्रभात वृत्तसेवा
मांढरदेव – महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या मांढरदेव, ता. वाई येथे पौष महिन्यात सुरू असलेल्या यात्रेमध्ये काही व्यावसायिक भेसळयुक्त मलई, कलाकंद, बर्फी आदी खाद्यपदार्थांची चोरटी विक्री करत आहेत. संबंधित व्यापार्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ आणि भाविकांनी केली आहे.
पौष महिन्यात काळूबाईदेवीची यात्रा सुरू असून, मांढरदेव येथे दर्शनासाठी रोज हजारो भाविक येत आहेत. हे भाविक देवीच्या पूजेचे साहित्य आणि प्रसाद म्हणून मलई, कलाकंद, बर्फी खरेदी करत आहेत. नवरात्रीमध्ये येथील व्यापारी व स्टॉलधारकांना भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करू नये, अशी सूचना अन्नसुरक्षा अधिकार्यांनी दिली होती.
त्यामुळे गेले तीन महिने परराज्यातून येणार्या मिठाईची विक्री पूर्ण बंद करण्यात आली होती. मात्र, यात्रेचे दिवस व्यवसायासाठी फायदेशीर असल्याने, काही व्यापारी भेसळयुक्त मिठाईची चोरून विक्री करत असल्याचे दिसत आहे. हे व्यापारी भाविकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व भाविकांमधून होत आहे.





