The Hundred : अखेर जेतेपदाचा दुष्काळ संपला ! मँचेस्टर सुपर जायंट्स बनले ‘द हंड्रेड’चे नवे चॅम्पियन
‘द हंड्रेड’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत (The Hundred) मँचेस्टर सुपर जायंट्सने ट्रेंट रॉकेट्सचा ५ गडी राखून पराभव करत पहिल्यांदाच मानाचे विजेतेपद पटकावले.

The Hundred : सलग दोन अंतिम सामन्यांतील पराभवाची सल आणि जेतेपदाची लागलेली प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर एका अविस्मरणीय विजयाने संपली. ‘द हंड्रेड’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत (The Hundred) मँचेस्टर सुपर जायंट्सने ट्रेंट रॉकेट्सचा ५ गडी राखून पराभव करत पहिल्यांदाच मानाचे विजेतेपद पटकावले.
जोस बटलरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने (The Hundred) केवळ सामनाच जिंकला नाही, तर सुपर जायंट्स फ्रँचायझीच्या खात्यात पहिले वहिलं टी-२० लीग जेतेपद जमा केले. १६ ऑगस्ट रोजी झालेल्या या महामुकाबल्यात ट्रेंट रॉकेट्सने प्रथम फलंदाजी करताना १०० चेंडूंत ८ बाद १५८ धावा उभारल्या. त्यांच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही.
एन्यूरिन डोनाल्डने १९ चेंडूंत केलेली ३८ धावांची जलद खेळी त्यांच्या डावाचा मुख्य आधार ठरली. १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मँचेस्टरची सुरुवात धडाकेबाज झाली. सलामीवीर टिम सायफर्टने ट्रेंटच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवत अवघ्या ३९ चेंडूंत ७२ धावांची वादळी खेळी केली. संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा सायफर्ट या अंतिम सामन्याचाही खरा शिल्पकार ठरला.
𝐆𝐎𝐎𝐎𝐎𝐒𝐄𝐁𝐔𝐌𝐏𝐒𝐒𝐒 🥹 pic.twitter.com/I6XKniPzkk
— Manchester Super Giants (@ManchesterSG100) August 16, 2026
मात्र, सायफर्ट बाद झाल्यानंतर मँचेस्टरचा डाव अचानक गडगडला आणि सामन्यात प्रचंड नाट्य निर्माण झाले. सामना थेट शेवटच्या ३ चेंडूंवर येऊन ठेपला, जिथे विजयासाठी ३ धावांची गरज होती. संपूर्ण स्टेडियम श्वास रोखून पाहत असताना, लियाम डॉसनने पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकून २ चेंडू शिल्लक असतानाच मँचेस्टर सुपर जायंट्सच्या (The Hundred) ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. २०२२ आणि २०२३ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या मँचेस्टरने अखेर विजयाचा दुष्काळ संपवला.






