Manchar News | वसतिगृह प्रवेशावेळी विद्यार्थिनींची युपीटी टेस्ट नाही ; घोडेगाव प्रकल्प कार्यालयाचा खुलासा

प्रभात वृत्तसेवा
मंचर – घोडेगाव प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या विद्यार्थिनीची वसतिगृह प्रवेशावेळी किंवा प्रवेशानंतर कधीही गर्भ तपासणी (युपीटी टेस्ट) केली जात नाही. सोशल मिडिया किंवा इतर माध्यमातून गर्भ तपासणी (युपीटी टेस्ट) केली जात असल्याबाबतची चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये,असे आवाहन घोडेगाव प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी केले.
घोडेगाव प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या आश्रमशाळा व पुणे शहरातील वाकड येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश घेण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करताना गर्भतपासणी (युपीटी टेस्ट) करावी लागते. ही तपासणी करण्यासाठी विद्यार्थिनींची अथवा त्यांच्या पालकांची पूर्वपरवानगी घेतली जात नाही, अशा आशयाची बातमी सोशल मिडियाच्या प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाली आहे.
या बातमीच्या अनुषंगाने वस्तुस्थितीदर्शक अहवाल पुढीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे. या प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण २३ शासकीय आश्रमशाळा व २४ शासकीय वसतिगृह असून २४ वसतीगृहापैकी मुलींचे ११ वसतिगृह कार्यरत आहेत. मुलां-मुलींच्या वसतिगृह प्रवेशाच्या वेळी किंवा प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांच्या (मुले/मुली) आरोग्य तपासणी शासकीय रुग्णालयाकडून करण्यात यावी.
इतर विद्यार्थ्यांना बाधा होईल, असे संसर्गजन्य आजार अथवा गंभीर आजार असलेल्या मुलांना प्रवेश देण्यात येऊ नये.असे नमूद केलेले आहे. तथापि यामध्ये युपीटी टेस्टबाबत कोणतेही निर्देश किंवा सूचना दिलेल्या नाहीत.मी स्वतः तसेच कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी, महिला कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्था या देखील या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील आश्रमशाळांना व वसतिगृहांना भेटी देतात.परंतु भेटीच्या वेळी कोणत्याही विद्यार्थिनीने याबाबत तोंडी अथवा लेखी तक्रार केलेली नाही.
सोशल मिडियावरील बातम्यावस्तूस्थितीला धरून नाही..
सर्व आश्रमशाळांच्या ठिकाणी विशाखा समिती व शाळा व्यवस्थापन समिती कार्यान्वित आहे. या समितीमार्फतही युपीटी टेस्टबाबत कुठलीही लेखी अथवा तोंडी तक्रार या कार्यालयास प्राप्त नाही. त्यामुळे सोशल मिडीयाच्या माध्यमातून आलेल्या बातम्या वस्तूस्थितीला धरून नाही,असे स्पष्टीकरण घोडेगाव प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी दिले.





