Manchar News : मंचर राजकारणाचा नवा ट्रेंड ; जंतर-मंतरपासून मंदिरापर्यंत उमेदवारांची धावपळ

प्रभात वृत्तसेवा
मंचर – नगरपंचायतीतील नगरसेवकाच्या आरक्षण आणि नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे.आपल्या मतदारसंघातून निश्चित विजय मिळावा, यासाठी काही उमेदवार थेट देवाधर्माकडे वळले आहेत. देवाला उजवणी, मंदिरात अभिषेक, पूजाअर्चा, तसेच विविध आश्रमांतील बाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत असल्याचे चित्र दिसत आहे.काही उमेदवार तर थेट मांत्रिकांचा आधार घेत असून विरोधी उमेदवाराचा ‘बंदोबस्त’ कसा करता येईल, यासाठी विविध उपाययोजना आणि जंतर-मंतर करण्यात व्यस्त आहेत.
गावोगावी राजकीय चर्चांना यामुळे उधाण आले असून निवडणूक तारीख जाहीर होण्याअगोदरच धार्मिक आणि अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य मतदारांमध्ये मात्र यामुळे मनोरंजक चर्चा रंगल्या आहेत. “देव, बाबा आणि मांत्रिक हेच आता उमेदवारांच्या विजयाचं गुपित ठरणार काय?” असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीचा रंग आता राजकारणातून थेट अध्यात्माच्या वाटेवर गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.





