Manchar News – मंचर नगरपंचायत प्रशासनाने थकबाकीदार मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला असून नोटीस देऊनही कराचा भरणा न करणाऱ्यांवर नियमांनुसार मालमत्ता जप्ती, सील करणे किंवा लिलाव करणे तसेच नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.असा इशारा नगरपंचायतीचे अतिरिक्त मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी दिला. मंचर शहरातील मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकीत वसुली वाढविण्यासाठी मंचर नगरपंचायत प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मंचर शहरात एकूण १५,७८९ मालमत्ता असून सन २०२५–२०२६ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कराची एकूण मागणी ७ कोटी ८५ लाख ६२ हजार रुपये इतकी आहे. यापैकी २ कोटी ५८ लाख १९ हजार रुपये वसुल झाले असून सुमारे ४ कोटी २१ लाख ४५ हजार रुपये वसुल करणे बाकी आहे. तसेच शहरात ५,६३३ नळ जोडण्या असून पाणीपट्टीची एकूण मागणी १ कोटी ५५ लाख ७१ हजार रुपये आहे. त्यापैकी ३८ लाख ४१ हजार रुपये वसुल झाले असून १ कोटी १७ लाख २९ हजार रुपये वसुल करणे बाकी आहे. थकीत कर वसुलीसाठी नगरपंचायतीकडून शहरातील ६ वॉर्डमध्ये प्रत्येकी चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून ते संबंधित मालमत्ताधारकांकडील थकीत व चालू कराची वसुली करीत आहेत. मोठ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून आतापर्यंत १०० पेक्षा अधिक मालमत्ताधारकांना १५ दिवस मुदतीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शहरातील थकीत वसुली वाढविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून प्रत्येक विभाग प्रमुखांना १५ लाख रुपये व इतर कर्मचाऱ्यांना ५ लाख रुपये इतके वसुली उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी देण्यात आले आहे.वॉर्डनिहाय थकीत देयकदारांची सविस्तर यादी (नाव, पत्ता व मोबाईल क्रमांकासह) संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. प्रत्यक्ष संपर्क साधून वसुलीची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व नागरिकांनी जप्ती व नळ कनेक्शन खंडित करण्याची अप्रिय कारवाई टाळण्यासाठी आपला मालमत्ता कर व पाणीपट्टीचा भरणा तात्काळ करावा, असे आवाहन नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी केले आहे.