Manchar Crime | स्वामी समर्थ मंदिरातून पादुका चोरीला ; सीसीटीव्ही कॅमेरात चोरीची घटना कैद

प्रभात वृत्तसेवा
मंचर – येथील बेंडेमळा येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात चोरी झाली असून चोरट्यांनी अंदाजे 1 लाख रुपये किंमतीच्या स्वामींच्या चांदीच्या पादुका चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि. 1) पहाटे घडली. महिला आणि पुरुष चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्याने दरवाजा तोडून पादुका चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे.
बेंडेमळा येथे स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर असून मंदिरात दररोजच्या आरतीचे काम प्रगती बेंडे या करतात. नेहमीप्रमाणे त्या रविवारी सायंकाळी आरती करून मंदिराच्या दरवाजा लावून घरी गेल्या होत्या. दुसर्या दिवशी त्यांना स्थानिक नागरिकांनी मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी मंदिरात येऊन पाहिले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कटावणीच्या साह्याने मंदिराच्या गाभार्याचे दरवाज्याची कुलूप कडी तोडून पादुका चोरून नेल्याचे लक्षात आले.
तसेच दानपेटी ही फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र दानपेटी साखळीने बांधलेली व कुलूप लावलेली असल्यामुळे त्यातील रक्कम चोरून नेता आली नाही. स्थानिक नागरिकांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान एक महिला व एक पुरुष चोरी करताना दिसून आल्याचे उद्योजक सतीश बेंडे पाटील यांनी सांगितले. याबाबत स्वामी भक्त शेखर जाधव यांनी मंचर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्यात दिली आहे.
“माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निवासस्थान असलेल्या बंगल्यासमोरील गेटच्या समोरच श्री स्वामी समर्थ मंदिर आहे. तेथे चांदीच्या पादुकांची चोरी झाली. मंचर-बेंडेमळा येथे काही दिवसांपूर्वी रस्त्याने पायी जाणार्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेरे आणि पथदिवे सुरु करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन यांना सांगूनही ते दुर्लक्ष करत असून पोलीस प्रशासनाने या परिसरात गस्त वाढवावी.”
-प्रगती बेंडे, स्थानिक रहिवासी बेंडेमळा





