Manchar News : “आधी जमिनीचं भाडं द्या, मग बिल मागा”; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युक्तिवादानंतर महावितरणने मानली हार

प्रभात वृत्तसेवा
मंचर – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील साडेसात एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या विद्युत मोटारींची वीज कनेक्शन खंडित करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली होती.या कारवाईस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी तीव्र आक्षेप नोंदवून मंचर कार्यकारी अभियंत्याशी फोनवरून थेट बोलणी करून खंडित वीज जोडण्याचा निर्णय घ्यायला भाग पाडले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी निरगुडसर ता.आंबेगाव येथील महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता नितेश बसारकर यांना धारेवर धरत शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न सोडविण्यास भाग पाडले.
यावेळी 2003 च्या विद्युत कायद्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेल्या तारा, पोल, डीपी यासाठी शेतकऱ्यांना भाडे न दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच 2010 साली दाखल व 2012 साली शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागलेल्या जनहित याचिकेचा दाखला देत, महावितरणने शेतकऱ्यांकडून आठ तासांच्या विजेचे बिल घेत असताना शासनाकडून सोळा तासांचे अनुदान घेतल्याचे नमूद केले.
महावितरणकडून व्यवहार दोन्ही बाजूंनी न्याय झाला पाहिजे, असा ठाम युक्तिवाद बांगर यांनी केला. अखेर महावितरणने नमते घेत शेतकऱ्यांची वीज पुन्हा जोडण्याचा शब्द दिल्याचे प्रभाकर बांगर यांनी सांगितले.पारगाव,शिंगवे, लाखनगाव, देवगाव येथील शेतकरी या वेळी चर्चे प्रसंगी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आभार मानले.
“शेतकऱ्यांच्या विज जोडणी संदर्भात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांना सूचना केल्या असून त्या पद्धतीने कार्यवाही सुरू केली आहे.”
-रामदास वळसे पाटील, स्वीय सहाय्यक, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील.
“ज्या शेतकऱ्यांची थकीत रक्कम काही लाखांत किंवा लाखापेक्षा कमी आहे, त्यांनी पाच ते दहा हजार रुपये भरल्यास एका तासात वीज जोडणी करून सहकार्य केले जाईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत.”
– राहुल गवारे, कार्यकारी अभियंता, वीज वितरण विभाग, मंचर





