Pune Rural Police : पोलिसांची मोठी कारवाई; ४० गुन्हे उघड, ४६ लाखांच्या मुद्देमालासह सराईत टोळी जेरबंद!
Pune Rural Police : पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या असून, यात एकूण ४० गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

Pune Rural Police – जबरी चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत टोळ्यांचा पर्दाफाश करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४० गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हर्षल दत्तात्रय तांदळे (२५) आणि महेश दत्तात्रय मंगळवेढेकर (२५, दोघेही रा. मंचर, ता. आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी तांदळे व मंगळवेढेकर हे काही गुन्ह्यांत सहभागी असल्याची माहिती मिळाली होती.
त्यांना पोंदेवाडी घाट परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून २३ गुन्हे उघडकीस आणत वीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, एक दुचाकी आणि दोन बंब असा २९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरी करणाऱ्याला बेड्या, १७ गुन्हे उघडकीस
अल्पवयीन मुलांच्या मदतीने जबरी चोरी, चेन स्नॅचिंग करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १७ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पीयूष बिरम नानावत (१९, रा. सांगेशी, कामशेत, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नानावत हा काही दिवसांपूर्वीच बालसुधारगृहातून बाहेर आला आहे. त्याने इतर दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने १६ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जबरी चोरी, चेन स्नॅचिंगसारखे गुन्हे केले आहेत. त्याच्याकडून १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दुचाकी असा १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.





