Manchar: रिक्षा ते रिल्स! मंचर निवडणुकीचा ‘हायटेक’ फीवर; उमेदवारांची सोशल मीडियावर तुफान बॅटिंग

प्रभात वृत्तसेवा
मंचर – मंचर नगरपंचायतीच्या मतदान निवडणूक मंगळवार, दि. २ रोजी होत असल्याने मतदानाचा दिवस तारीख जवळ येत असून संपूर्ण शहरात निवडणूकमय वातावरण निर्माण झाले आहे. पदयात्रा, ढोल-ताशे, टेम्पो आणि रिक्षावर लावलेल्या स्पीकर्समधून उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू झाला आहे.सकाळपासून रात्रीपर्यंत विविध प्रभागांमध्ये उमेदवारांचे लहानमोठे जथ्थे फिरत असून मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे.
यावेळी सोशल मीडियाचाही तितकाच प्रभाव दिसून येत आहे. रील, फेसबुक पोस्ट, व्हाट्सअप स्टेटस आणि प्रचारासाठी खास तयार केलेले व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. प्रत्येक उमेदवार स्वतःची कामगिरी, आश्वासने आणि सपोर्ट टीमचे सामर्थ्य दाखवण्यासाठी सर्जनशील पद्धतीने डिजिटल प्रचार करत आहे.
तर काही कार्यकर्त्यांनी तरुण मतदारांना लक्ष्य करत आकर्षक गाणी, विशेष कट्स आणि प्रोमो व्हिडिओ तयार केले आहेत. शहरातील मुख्य मार्ग, चौक, बाजारपेठा याठिकाणी पोस्टर आणि बॅनरमुळे निवडणुकीची धामधूम आणखी वाढली आहे.
पारंपरिक पद्धतीचाही वापर
रिक्षा–टेम्पोतून चालणाऱ्या प्रचार जाहिरातींमुळे वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. मतदारांशी संवाद साधण्यासाठी घर भेटी, बैठक आणि कोपरा सभा आयोजित केल्या जात आहेत.सोशल मीडिया आणि पारंपरिक पद्धतींचा संगम झाल्याने मंचरमध्ये निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, संपूर्ण शहराचा चेहरामोहरा सध्या निवडणुकीच्या रंगात रंगला आहे.





