तमाशा फडाचे पैसे घेऊन व्यवस्थापक फरार; 40 तमाशा कलावंत, बिगारी व फडमालकीण यांच्यावर उपासमारीची वेळ

नारायणगाव – स्वाती शेवगावकरसह अंजली शेवगावकर तमाशाचा व्यवस्थापक एस. के. शेख हा तमाशा कलावंताच्या पगाराचे पैसे न देता तमाशा कार्यक्रमाचे पैसे घेऊन फरार झाला आहे. त्यामुळे सुमारे 40 तमाशा कलावंत, बिगारी व फडमालकीण यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकरणी तमाशा कलावंत नंदिनी विजय शिंदे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
नारायणगाव तमाशाचे केंद्र असल्याने यात्रा, जत्रांच्या तमाशा कार्यक्रमाच्या नोंदणी साठी येथील तमाशा पंढरीत स्वाती शेवगावकरसह अंजली शेवगावकर या फडाची राहुटी एक महिन्यापूर्वी उभारली होती. तमाशात फडमालकीण स्वाती शेवगावकर यांच्यासह सुमारे 40 कलावंत व बिगारी कामगार आहेत. नोंदणी झालेल्या तमाशा कार्यक्रमाचे पैसे व्यवस्थापक एस. के. शेख जमा करत होता. मागील एक महिन्यापासून तमाशा कलावंत या तमाशात काम करत आहेत.
6 मे 2022 रोजी तमाशा हंगाम संपल्यानंतर हिशोब करून तमाशा कलावंत व कामगार यांच्या पगाराचे पैसे न देताच व्यवस्थापक शेख पैसे घेऊन फरार झाला. त्यामुळे गरीब तमाशा कलावंत व फडमालकीण स्वाती शेवगावकर यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून सध्या त्यांचा मुक्काम नारायणगाव येथे उभारलेल्या राहुटीत असून मागील तीन दिवसां पासून सर्व कलावंत वडापाव खाऊन उदरनिर्वाह करत आहेत.
व्यवस्थापक एस. के. शेख हा गुन्हेगार पार्श्वभूमीचा आहे. पैशासाठी या पूर्वी त्याने मला अनेकवेळा मारहाण केली आहे. त्याला राजकीय वरदहस्त असल्याने मला न्याय मिळत नाही. तो पैसे घेऊन फरार झाल्याने कलावंत, भाड्याने घेतलेल्या गाड्या व इतर साहित्याचे पैसे कसे फेडायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-स्वाती शेवगावकर, फडमालकीण





