Man News: …आणि ती २४ निष्पाप जनावरं वाचली! माण तालुक्यातील थरारक कारवाई, नक्की काय घडलं?
Man News: पशु रक्षक आणि दहिवडी पोलिसांच्या तत्परतेमुळे मुक्या प्राण्यांना जीवदान; बंद घरातील धक्कादायक प्रकार समोर.

Man News – माण तालुक्यातील टाकेवाडी गावच्या हद्दीत एका बंद घरामध्ये कत्तल करण्याच्या उद्देशाने तब्बल 24 गोवंशाचा अत्यंत निर्घृणपणे कोंडमारा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींसह घरमालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पशु रक्षक आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे सर्व मुक्या जनावरांची वेळेत सुटका करण्यात यश आले आहे.
अधिक माहिती अशी, टाकेवाडी येथील सतोबा मंदिराच्या पायथ्याशी, डोंगराच्या कडेला असलेल्या एका बंद घरात कत्तल करण्यासाठी जर्सी गायींची वासरे आणि देशी वासरे कोंडून ठेवण्यात आली होती. याबाबतची माहिती गोरक्षक सतीश ममदने (रा. मोगराळे, ता. माण) यांनी राज्य शासनाचे मानद प्राणी कल्याण अधिकारी अवधूत गोरख धुमाळ यांना दिली. माहिती मिळताच अवधूत धुमाळ हे त्यांचे मित्र गो रक्षक दिनेश पवार यांच्यासह टाकेवाडी येथे पोहोचले.
तेथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या संतोबा मंदिराच्या परिसरातील बंद घराजवळ गेले असता, त्यांना आतून जनावरांच्या ओरडण्याचा मोठा आवाज आला. त्यांनी तात्काळ ‘डायल 112’ वर कॉल करून पोलिसांना पाचारण केले. काही वेळातच दहीवडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि गो रक्षकांनी मिळून बंद घराचा दरवाजा उघडला असता, आत 22 जर्सी वासरे, 1 देशी गाय आणि 1 वासरू अशी एकूण 24 जनावरे डांबून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.
स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे बंद घर विठ्ठल मोहिते व शिवाजी बळीप यांच्या मालकीचे असून, काही अज्ञात इसमांच्या मदतीने जनावरांची कत्तल करण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अवधूत धुमाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस फौजदार पी. जी. हांगे करत आहेत.




