Dahiwadi Police: अॅल्युमिनियम तारा चोरणारी टोळी जेरबंद; दहिवडी पोलिसांची मोठी कारवाई
Dahiwadi Police: माण तालुक्यातील आंधळी येथील सोलर प्लांटमधून १२०० मीटर अॅल्युमिनियम तार आणि २ लोखंडी पोल चोरणारे चार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.

Dahiwadi Police – दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे आंधळी (ता. माण) गावच्या शिवारात असलेल्या एका सोलर प्लांटमधून एसएस इलेक्ट्रिकल कंपनीची तब्बल 82,500 रुपये किमतीची 1200 मीटर अॅल्युमिनियम तार आणि 2 लोखंडी पोल चोरणार्या आंतरजिल्हा टोळीला अटक करण्यात दहिवडी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी इलेक्ट्रिशियन सुपरवायझर विश्वास नामदेव पांढरे (रा. देगाव, जि. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
24 मे ते 1 जून 2026 दरम्यान शुभम चिंचकर यांच्या शेतातील सूर्यघर प्लांटमध्ये ही चोरीची घटना घडली होती. गुन्ह्याचा तपास करत असताना दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि त्यांच्या पथकाला कंपनीच्या लाईनवर काम करणार्या काही कामगारांवर संशय आला. त्याआधारे पोलिसांनी कसून चौकशी केली असता, हा गुन्हा गोंदिया जिल्ह्यातील टोळीने केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तात्काळ दीपक गोविंद मेश्राम (रा. तेलनखेडी, ता. गोरेगाव), राहुल चरण अल गदेवे (रा. डुमरटोला, ता. सालेकसा), दुर्गेश राधेलाल मौजे आणि संदीप बकाराम तुमसरे (रा. सुरजाटोला, ता. सालेकसा, सर्व रा. जिल्हा गोंदिया) यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल (1200 मीटर तार व 2 लोखंडी पोल) हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि दहिवडी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे, चांदणी मोटे, पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव भोलताडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हांगे, पोलीस हवालदार विजय खाडे, सचिन जगताप, नितीन लोखंडे, नितीन धुमाळ, तसेच पोलीस कॉन्स्टेबल नीलेश कुदळे, अजिनाथ नरबट, महेंद्र खाडे आणि गणेश खाडे यांच्या पथकाने अत्यंत चातुर्याने पार पाडली.





