Satara | माण-खटाव मतदार संघ हा काँग्रेसचाच राहणार

दहिवडी, (प्रतिनिधी) – माण खटाव मतदार हा काँग्रेसचाच असेल आणि रणजित देशमुखच ही निवडणूक जिंकणार असल्याने सर्वांनी तयारीला लागण्याच्या सूचना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
माण-खटाव विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाच्या बीएलई व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा पिंगळी येथील वैभव मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख,
माजी आ. रामहरी रुपनवर, राजेंद्र शेलार, काँग्रेसचे माण तालुकाध्यक्ष अध्यक्ष बाबासाहेब माने, खटाव तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, प्रा. विश्वंभर बाबर, विजय शिंदे, जयवंत खराडे, महिला अध्यक्षा नकुसा जाधव इत्यादींसह महिला आणि पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, मित्र पक्षांकडून अपक्ष उमेदवार देण्याबाबत भूमिका मांडली होती, त्यामुळेच या मतदार संघात परिवर्तन घडावे, म्हणून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता.
पावसाचे पाणी साठवण्यासाठी साखळी बंधाऱ्यांची योजना दुष्काळी भागात राबवली. खोके सरकारचे खरे सुत्रधार हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा असल्याचे सांगत महाविकास आघाडीचे सरकार त्यांनी चोरल्याचा आरोप ही चव्हाण यांनी केला. पापात निर्माण झालेले भ्रष्टाचारी सरकार हे सध्या राज्यात काम करत आहे. मालवणची घटना ही या अनैतिक सरकारच्या पापाचे जिवंत उदाहरण असल्याचे ही चव्हाण म्हणाले.
ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे म्हणाले, काँग्रेसचा विचारच देशाला तारेल. लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती ही येणाऱ्या विधानसभेत होणार आहे, हा विश्वास व्यक्त केला.
सर्व महापुरुषांचे पुतळे वारे खात उभे आहेत, मात्र महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडल्याचे कारण सांगणे लाजिरवाणे असल्याची खंत व्यक्त केली. भाजपला रामाचा शाप आहे,
त्यामुळे महाराष्ट्रात राम मंदिरे असलेल्या ठिकाणी भाजपचे उमेदवार पडले. पृथ्वीराज चव्हाणांनी या भागासाठी १६०० कोटी रुपये दिल्यानेच या भागात पाणी आले. या मतदार संघात समोर जरी ‘जय’ असला तरी जित ही रणजित देशमुखांचीच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रणजितसिंह देशमुख म्हणाले, हा मतदार संघ पूर्वीपासून काँग्रेसच्या विचारांचा आहे. माण आणि खटावला पाणी देण्याची भूमिका ही पृथ्वीराज चव्हाण यांची असल्याने ते खरे जलनायक आहेत.
सध्या या मतदार संघात वाहत असलेल्या पाण्याचे श्रेय हे पृथ्वीराज चव्हाण यांचे असल्याचेही त्यांनी सांगितले. अजित चिखलीकर, राजेंद्र शेलार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक एम. के. भोसले यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. महेश गुरव यांनी केले.





