पीएफ व्याज दर कपातीच्या निर्णयाच्या विरोधात ममता कडाडल्या

कोलकाता – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर गेल्या चार दशकांच्या नीचांकी पातळीवर वर आणण्याच्या केंद्राच्या निर्णयावर तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी तीव्र टीका केली आहे.
आज एका ट्विटमध्ये बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, भाजपच्या नुकत्याच झालेल्या विजयानंतर त्यांनी जनतेला दिलेली ही गिफ्ट आहे. केंद्र सरकारचा हा काळा निर्णय असून सर्वांनी एकजुटीने हा निर्णय हाणून पाडला पाहिजे. या निर्णयाचा मोठा फटका देशातील मध्यम आणि निम्न-मध्यमवर्गीय कामगार आणि कर्मचाऱ्यांना बसणार आहे.
सरकारचा हा निर्णय एकतर्फी आणि सर्वसामान्यांवर घोर अन्याय करणारा आहे असे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी पीएफच्या व्याज दरात 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्के इतकी कपात केली आहे. हा गेल्या चाळीस वर्षातील सर्वात नीचांकी व्याज दर असून त्याचा अनेक राजकीय पक्षांनी जोरदार निषेध केला आहे.





