नवी दिल्ली: अमेरिकन फेडरल रिझर्व्हने (US Fed Rate Cut) काल, २९ ऑक्टोबर रोजी बेंचमार्क कर्ज दरात (लेंडिंग रेट) २५ बेसिस पॉईंट्स (०.२५ टक्के) कपात करण्याची मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर रातोरात कर्ज दर (ओव्हरनाईट लेंडिंग रेट) आता ३.७५ ते ४ टक्के यादरम्यान खाली आले आहेत. या कपातीची अपेक्षा होतीच. आर्थिक घडामोडींना बळ, तर महागाई कायम – यूएस फेडच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतील आर्थिक घडामोडी मध्यम गतीने वाढत आहेत. अमेरिकन सेंट्रल बँकेने स्पष्ट केले आहे की, यावर्षी रोजगाराच्या वाढीची गती मंदावली आहे आणि ऑगस्टपर्यंत बेरोजगारीचा दर किंचित वाढला असला तरी तो कमीच राहिला आहे. महागाई वर्षाच्या सुरुवातीपासून वाढली असून ती ‘थोडी जास्त’ पातळीवर कायम आहे. क्वांटिटेटिव्ह टायटनिंग होणार ‘बंद’, तरलता वाढणार – या महत्त्वपूर्ण निर्णयासोबतच, फेडरल रिझर्व्हने ‘क्वांटिटेटिव्ह टायटनिंग’ (Quantitative Tightening) प्रक्रिया थांबवण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे वित्तीय प्रणालीमध्ये तरलता (लिक्विडिटी) वाढण्याची आणि कर्ज मिळण्याच्या अटी अधिक सोप्या होण्याची अपेक्षा आहे. मात्र, आर्थिक दृष्टिकोनाबद्दल (Economic Outlook) अनिश्चितता अजूनही मोठी आहे, असेही यूएस फेडने नमूद केले आहे. भारतासाठी काय? आरबीआय दर कपात करणार? अमेरिकेने व्याजदरात कपात केल्यामुळे आता पुढील महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) देखील रेपो दरात कपात करण्याची शक्यता बळावली आहे. अनेक जाणकारांनी अंदाज वर्तवला आहे की, डिसेंबर महिन्यातील पतधोरण आढाव्यात आरबीआय देखील व्याजदर कमी करून भारतीयांना ‘गुड न्यूज’ देऊ शकते. पुढील कपातीचा अंदाज – यूएस फेडरल रिझर्व्हने डिसेंबर २०२४ नंतर पहिल्यांदा कर्ज दरात कपात केली आहे. पुढील बैठकीत आणखी २५ बेसिस पॉईंट्सची कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे व्याजदर ३.५० ते ३.७५ टक्के या दरम्यान येऊ शकतो. महागाई आणि बेरोजगारीची स्थिती – अमेरिकेतील मुख्य महागाई (Core Inflation) सलग तीन महिन्यांपासून ३ टक्क्यांवर स्थिर आहे, जी फेडरल रिझर्व्हच्या २ टक्के लक्ष्यापेक्षा १ टक्का अधिक आहे. यामुळे धोरणकर्त्यांकडे (Policy Makers) अधिक सूट देण्याची संधी कमी झाली आहे. मात्र, बेरोजगारीच्या दाव्यांमध्ये वाढ आणि श्रम बाजारातील (Labour Market) कमजोर संकेतांमुळे अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी पुढील दर कपातीची मागणी वाढली आहे.