Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का ! ‘हे’ 2 मोठे नेते करणार भाजपात प्रवेश

येत्या काही महिन्यांमध्ये राज्यात स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. यादरम्यान अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहेत. यादरम्यान भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचे दोन नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यातील एक प्रवेश उद्या म्हणजे मंगळवारी होणार आहे, तर दुसरा पक्षप्रवेश हा एक ऑगस्टनंतर होणार असल्याचे समजत आहे.
‘हे’ नेते करणार भाजपात प्रवेश
काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि पाथरीचे माजी आमदार सुरेश वरपूडकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुरेश वरपूडकर हे उद्या मंगळवारी भाजपात प्रवेश करणार आहेत. तर कैलास गोरंट्याल यांचा एक ऑगस्टनंतर भाजपात प्रवेश होणार आहे. कैलास गोरंट्याल यांच्यासोबत काही नगरसेवकही भाजपात प्रवेश करणार आहेत. गोरंट्याल यांच्या पक्ष प्रवेशावेळी भाजप नेते अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे आणि राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत, महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला लागलेली गळती थांबण्यात कुठेतरी महाविकास आघाडीची कसरत होताना दिसत आहे.
कोण आहे कैलास गोरंट्याल?
जालन्यातील काँग्रेसचे बडे नेते आणि कट्टर काँग्रेसी म्हणून आमदार कैलास गोरंट्याल यांची ओळख आहे.गोरंट्याल यांची राजकीय कारकिर्द नगरसेवक पदापासून झाली. त्यानंतर ते विधानसभेवर तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. जालन्यात काँग्रेस मजबूत करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. ते जालन्यातील काँग्रेसचे एकमेव बडे नेते असून त्यांचा प्रचंड लोक संपर्क आहे. त्यांचं अख्खं कुटुंब काँग्रेसमध्येच आहे. गोरंट्याल हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे अत्यंत जवळचे होते. ते अशोक चव्हाण यांचेही निकटवर्तीय मानले जातात.
कोण आहे सुरेश वरपूडकर ?
परभणी जिल्ह्यातील महत्वाचे नाव म्हणजे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व पक्षाचे मुख्य प्रतोद सुरेश वरपूडकर. वरपूडकर यांनी कायमच परभणी जिल्ह्याचे राजकरण स्वत: भोवती केंद्रित ठेवले. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवाराचा पराभव करण्याचा विक्रम सुरेश वरपूडकर यांच्या नावावर आहे. 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली आणि परभणी जिल्ह्यात सर्वात प्रथम सुरेश वरपूडकर यांनी शरद पवार यांना साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वरपूडकर यांनी अशोक चव्हाण यांच्याशी भेटून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र त्यांचा २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाला. यानंतर त्यांनी जोमाने निवडणूक लढवत २०१९ मध्ये पाथरी मतदारसंघातून विजय मिळवला. मात्र २०२४ च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. धर्मनिरपेक्ष नेते अशी प्रतिमा असल्याने जिल्ह्यातील दलित-मुस्लीम मतदारात वरपूडकर यांचा मोठा प्रभाव आहे.





