Mamata Banerjee : बंगाली अस्मितेचे कार्ड हाती घेत ममता बॅनर्जी यांनी भाजपला दिले आव्हान

कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगाली अस्मितेचे कार्ड हाती घेत भाजपला आव्हान दिले आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचा पराभव होईपर्यंत राजकीय लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ममतांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेसने सोमवारी कोलकत्यात शहीद दिवस रॅलीचे आयोजन केले. त्या रॅलीमध्ये सहभागी मोठ्या जनसमुदायासमोर बोलताना ममतांनी नेहमीच्या शैलीत आक्रमक भूमिका मांडली.
बंगालींविरोधात भाजपने भाषिक दहशतवाद चालवला आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही भाषा आंदोलन करू. बंगालींवरील हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी २७ जुलैपासून भाषा आंदोलन सुरू होईल, असे त्यांनी जाहीर केले. पुढील वर्षी बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होईल. त्या निवडणुकीत राज्याची सत्ता राखतानाच तृणमूलने अधिक जागा जिंकायला हव्यात. त्यानंतर भाजपच्या पराभवासाठी आम्ही दिल्लीकडे कूच करू, असे त्या म्हणाल्या.
त्यातून त्यांनी एकप्रकारे आगामी निवडणुकीसाठीच्या प्रचाराचे रणशिंगही फुंकले. भाजपवर शाब्दिक हल्ला करण्यासाठी त्यांनी त्या पक्षाची सत्ता असणाऱ्या राज्यांत बंगालींना कथितपणे लक्ष्य केले जात असल्याच्या आरोपाचा आधार घेतला. ममतांनी निवडणूक आयोगावरही टीकास्त्र सोडले. भाजपच्या निर्देशांनुसार आयोग कार्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला.





