Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेसमध्ये परतावे; ‘या’ बड्या नेत्याने केले आवाहन
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी कॉंग्रेसमध्ये परतावे, असे आग्रही आवाहन त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अधिररंजन चौधरी यांनी गुरूवारी केले.

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी कॉंग्रेसमध्ये परतावे, असे आग्रही आवाहन त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अधिररंजन चौधरी यांनी गुरूवारी केले. ममतांनी कॉंग्रेसच्या बंगाल शाखेचे नेतृत्व केल्यास कुणी आक्षेप घेणार नाही, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली. ममतांनी काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसमधून बाहेर पडत तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली.
मात्र, तृणमूलमध्ये काही महिन्यांपूर्वी उभी फूट पडली. त्यानंतर तृणमूलचा ताबा स्वत:कडे ठेवण्यासाठी ममतांना झगडावे लागत आहे. त्या पक्षाच्या बंगालमधील दोन-तृतीयांश आमदार आणि खासदारांनी ममतांची साथ सोडली.
तृणमूलने विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे बंगालची सत्ता गमावल्यानंतर त्या घडामोडी घडल्या. त्यामुळे ममतांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर, कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष चौधरी यांनी मांडलेली भूमिका राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरली आहे.
सध्या ममतांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीत राजकीय आश्रय घेतला आहे. त्याऐवजी त्यांनी उरलेल्या आमदार आणि खासदारांसमवेत कॉंग्रेसमध्ये फेरप्रवेश करावा. बंगालमधील कॉंग्रेसजन ममतांचे (Mamata Banerjee) नेतृत्व स्वीकारतील. बंगालमधील सध्याच्या राजकीय स्थितीत वेगळ्या पक्षाची गरज नाही. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममतांच्या तृणमूलमध्ये फारसे काही उरलेले नाही, असे चौधरी यांनी म्हटले.
ममतांचा (Mamata Banerjee) फेरप्रवेश सुकर करण्यासाठी पाऊले उचलण्याचे साकडेही त्यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींना घातले. ममतांचे खासदार भाचे अभिषेक बॅनर्जी यांना मात्र विरोध असल्याचे संकेत चौधरी यांनी दिले. त्यांनी अभिषेक यांचा थेट नामोल्लेख टाळला. ममतांनी बॅगेज मागे ठेऊन कॉंग्रेसमध्ये फेरप्रवेश करावा, अशी सूचक टिप्पणी चौधरी यांनी केली. त्यांची भूमिका राजकीय चर्चांना खतपाणी घालणारी ठरण्याची चिन्हे आहेत.






