ममता बॅनर्जींनी जशोदाबेनला दिली साडी भेट
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला जात असताना त्यांची जसोदाबेन यांच्याशी भेट झाली. जशोदाबेन यांची भेट घेण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी नियोजित विमान रद्द केले. यानंतर बराच वेळ दोघी विमानतळावर गप्पा मारत होत्या. ममता बॅनर्जी यांनी जशोदाबेन यांना भेट म्हणून एक साडीदेखील दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.
जशोदाबेन झारखंडमधील धनबादच्या दोन दिवसाच्या दौऱ्यानंतर पुन्हा आपल्या घरी चालल्या होत्या. ममता बॅनर्जी यांच्या नजीकच्या काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक झालेल्या या भेटीदरम्यान दोघी एकमेकींची आपुलकीने चौकशी करत होत्या. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जशोदाबेन यांना साडी भेट म्हणून दिली. ममता बॅनर्जी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीत गेल्या होत्या. ही भेट नियोजित होती. यावेळी राज्याला मिळणाऱ्या निधीसहित वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.