Mamata Banerjee : माझी उमेदवारीच रद्द करण्याचे कारस्थान; ममतांचा सनसनाटी दावा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी शनिवारी सनसनाटी दावा केला. भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने भवानीपूर मतदारसंघातील माझी उमेदवारीच रद्द करण्याचे कारस्थान रचले.

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी शनिवारी सनसनाटी दावा केला. भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने भवानीपूर मतदारसंघातील माझी उमेदवारीच रद्द करण्याचे कारस्थान रचले. मात्र, ते कारस्थान आम्ही उधळले, असे त्या म्हणाल्या.
माझ्या (Mamata Banerjee) विरोधात शुक्रवारी दोन खोटी प्रतिज्ञापत्रं दाखल करण्याचा प्रयत्न झाला. त्यामागे उमेदवार म्हणून माझा पत्ता कट करण्याचा डाव होता.
मात्र, बंगाली जनतेच्या आशीर्वादामुळे आणि तृणमूल कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे तो डाव अयशस्वी ठरला, असा गौप्यस्फोट ममतांनी एका प्रचारसभेत बोलताना केला.
अर्थात, त्यांनी अधिक तपशील उघड केला नाही. संबंधित मतदारसंघातून भाजपचे प्रमुख नेते सुवेंदू अधिकारी त्यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, मतदारयाद्यांची पडताळणी (एसआयआर) म्हणजे मोठा घोटाळा आहे.
ती बाब एक दिवस नक्कीच सिद्ध होईल. एसआयआरच्या (Mamata Banerjee) माध्यमातून जबरदस्तीने बंगालमधील ९० लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. लोकशाही पद्धतीने निवडणुका जिंकण्याची क्षमता भाजपमध्ये नाही. त्यामुळे तो पक्ष गैरमार्गांनी मतं मिळवण्याचे कारस्थान करत आहे.
निकाल स्वत:च्या बाजूने लागण्यासाठी तो पक्ष इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्येही (इव्हीएम) फेरफाराचे तंत्र अवलंबतो. अर्थात, एक ना एक दिवस योग्य न्याय होईल. आधी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल. त्यानंतर त्या पक्षाला केंद्रातील सत्तेवरून पायउतार व्हावे लागेल, असा इशारा ममतांनी दिला.






