Mallikarjun Kharge : मोदींना हटवा; लोकशाही वाचवा; मल्लिकार्जुन खर्गे यांचे जनतेला आवाहन
खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावर जोरदार टीका केली. "मोदीजी, फक्त तुमचे पोलीस काम करतात अशा भ्रमात राहू नका. तुम्ही सीबीआय, ईडी आणि इतर केंद्रीय यंत्रणा मागे लावून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करता, पण आम्ही घाबरणारे नसून अखेरपर्यंत लढणारे नेते आहोत," असा थेट इशारा त्यांनी दिला.

Mallikarjun Kharge : नवी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत भव्य महारॅलीचे आयोजन केले होते. विरोधकांच्या या शक्तीप्रदर्शनात सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती आणि मैदान घोषणांनी दणाणून निघाले होते.
याच दरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) मंचावरून केंद्र सरकारवर तुफानी प्रहार करत होते. सभा रंगात आलेली असतानाच अचानक एक अनपेक्षित घटना घडली. खर्गे यांनी भर सभेत आपले भाषण अचानक थांबवले. संपूर्ण मैदानात काही क्षणांसाठी शांतता पसरली आणि उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नेमकं काय घडलं याबद्दल उत्सुकता व संभ्रम निर्माण झाला.
त्याच वेळी दोन-तीन नेते धावतपळत मंचावर आले. मात्र, हा कोणताही राजकीय अडथळा नसून तांत्रिक बिघाड असल्याचे समोर आले; माईक बंद पडल्यामुळे खर्गे शांत झाले होते. काही वेळातच माईक पूर्ववत सुरू करण्यात आला आणि खर्गेंनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली.
भाषणाला पुन्हा सुरुवात करत खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावर जोरदार टीका केली. “मोदीजी, फक्त तुमचे पोलीस काम करतात अशा भ्रमात राहू नका. तुम्ही सीबीआय, ईडी आणि इतर केंद्रीय यंत्रणा मागे लावून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करता, पण आम्ही घाबरणारे नसून अखेरपर्यंत लढणारे नेते आहोत,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
पुढे बोलताना त्यांनी देशातील मतदारांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा गंभीर आरोप केला. आज समाजात फूट पाडून नागरिकांचा मतदानाचा मूलभूत अधिकार हिरावून घेण्याचा डाव आखला जात असून जनतेने कोणाला मतदान करावे हे सत्ताधारी ठरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
केंद्र सरकारसह महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशातील सरकारांवर घणाघाती टीका करताना त्यांनी ही ‘चोरीची सरकारे’ असल्याचे म्हटले आणि यांची हकालपट्टी करण्याचे आवाहन जनतेला केले.
“मोदी सत्तेतून गेले तरच देशात लोकशाही टिकून राहील. त्यामुळे मोदींना हटवा आणि लोकशाही वाचवा,” असा थेट ‘मोदी हटाव’चा नारा देत त्यांनी (Mallikarjun Kharge) विरोधकांच्या एकजुटीवर भर दिला. सर्वांनी एकत्र येऊन लढा दिल्यास लोकशाही टिकेल आणि देश अधिक मजबूत होईल, असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी रामलीला मैदानावरील वातावरण तापवून सोडले.





