Mallikarjun Kharge : धर्माची निर्मिती मानवाच्या कल्याणासाठी; मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केले परखड मत
माणूस धर्मासाठी जन्माला आलेला नाही, तर धर्माची निर्मिती मानवाच्या कल्याणासाठी करण्यात आली आहे. जोपर्यंत आपण हे वास्तव स्वीकारत नाही, तोपर्यंत समाजाची प्रगती होणे अशक्य आहे, असे परखड मत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी व्यक्त केले.

Mallikarjun Kharge : माणूस धर्मासाठी जन्माला आलेला नाही, तर धर्माची निर्मिती मानवाच्या कल्याणासाठी करण्यात आली आहे. जोपर्यंत आपण हे वास्तव स्वीकारत नाही, तोपर्यंत समाजाची प्रगती होणे अशक्य आहे, असे परखड मत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी व्यक्त केले.
भल्की येथील श्री चन्नबसव आश्रमात हिरेमठ संस्थानचे डॉ. बसवलिंग पट्टादेवरु महास्वामीजी यांच्या ७५ व्या अमृत महोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि मंत्री ईश्वर खांद्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आपल्या भाषणात महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याचा गौरव केला. बसवण्णांनी मनुवाद आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था नाकारून सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणत एका नवीन सामाजिक व्यवस्थेची पायाभरणी केली, याची आठवण त्यांनी करून दिली.
खर्गे म्हणाले की, बसवण्णांनी स्थापन केलेला अनुभव मंटप ही जगातील पहिली आध्यात्मिक संसद होती, ज्याचे नेतृत्व मागास समाजातून आलेल्या अल्लामा प्रभू यांनी केले होते. समतेचा हा वारसा पुढे नेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशातील धार्मिक परिस्थितीवर भाष्य करताना खर्गे यांनी बौद्ध धर्माचे उदाहरण दिले. एकेकाळी भारतात उगम पावलेला आणि जगभरात पसरलेला बौद्ध धर्म स्वतःच्याच जन्मभूमीत आव्हानांचा सामना करत आहे. हीच परिस्थिती बसवण्णांच्या विचारांबाबत होऊ नये, यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण स्वतः बुद्ध, बसवण्णा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नारायण गुरू आणि कबीर यांसारख्या मानवतावादी विचारवंतांचे अनुयायी असल्याचेही त्यांनी अभिमानाने सांगितले. समाजात पसरलेल्या अंधश्रद्धेवर चिंता व्यक्त करताना खर्गे यांनी राजकीय मर्यादांचेही सूतोवाच केले.
ते म्हणाले (Mallikarjun Kharge) की, एक राजकारणी म्हणून मला अनेक गोष्टी उघडपणे बोलता येत नाहीत, कारण माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून बातम्या प्रसारित केल्या जातात. मात्र, समाजाने संघटित होऊन मानवतेचा धर्म जोपासला, तरच खऱ्या अर्थाने विकास होईल, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.






