प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे राज्यात चर्चा सुरू असतानाच, माळेगावात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष नितीन तावरे यांना बुधवारी (दि. १९) सायंकाळी मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे माळेगावातील राजकीय वातावरण तापले आहे.मारहाणीमागे राजकीय कारणे असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.माळेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी एकूण १० अर्ज दाखल झाले आहेत. अजित पवार आणि रंजन तावरे यांनी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर आता नगरपंचायत निवडणुकीत जुळवून घेतले असून, त्यांच्या पॅनेलसमोर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पॅनेलचे आव्हान आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तसेच माळेगाव नगरपंचायतीचे उमेदवार नितीन तावरे यांना झालेल्या मारहाणीमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. तावरे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून, गुन्हा दाखल करून अधिक माहिती देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. खासदार सुप्रिया सुळेंकडून हल्ल्याचा निषेध बारामती तालुक्यातील माळेगाव बु. नगरपंचायतीची निवडणूक लढवित असल्याचा राग मनात धरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला. लोकशाही प्रक्रियेत निवडणूक लढविणे हा नागरिकांचा अधिकार आहे. या अधिकारावरच आक्रमण करून नागरिकांचा आणि विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रकार अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे. आम्ही सर्वजण या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. माझी शासनाला विनंती आहे की, कृपया हा हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी. नीतीन तावरे हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावे, ही ईश्वरचरणी प्रार्थना, असे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. नितीन तावरे रुग्णालयात दाखल नितीन तावरे यांना झालेल्या मारहाणीत ते जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस त्यांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे.