Malaysia : मलेशियाच्या इस्लामिक वेल्फेअर होम्समध्ये लैंगिक शोषण; 402 मुलांची सुटका,171 जणांना अटक

Malaysia : मलेशियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी येथील एका मोठ्या इस्लामिक उद्योग समूहाशी संबंधित 20 कल्याणकारी कंपन्यांवर छापे टाकले असून, या कल्याणकारी गृहांमध्ये लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याची घटना उघड झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी 105 महिलांसह 171 जणांना अटक केली आहे.
यामध्ये शिक्षक आणि केअर टेकरचाही समावेश आहे. त्याचवेळी, 1 ते 17 वर्षे वयोगटातील 402 मुलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी ज्या 20 ठिकाणी कारवाई केली त्यापैकी 18 कल्याणकारी गृहे मध्य सेलंगोर राज्यात आहेत आणि 2 दक्षिण नेगेरी सेंबिलन राज्यात आहेत.
कल्याणकारी घरे इखवान ग्रुपशी संबंधित :
पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे कल्याण गृहात मुलांचे लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाची तक्रार आली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ही कल्याणकारी घरे मलेशियाच्या इखवान बिझनेस ग्रुपची असल्याचं सांगितलं गेलं आहे.
आयजी रझाउद्दीन हुसैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘काळजीवाहूंनी केवळ या मुलांचे लैंगिक शोषण केले नाही तर त्यांना आपापसात चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडले. एखादे मूल आजारी पडल्यास प्रकृती गंभीर होईपर्यंत त्याला उपचार दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. चुका केल्याबद्दल लहान मुलांना गरम चमच्याने जाळले जायचे, वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली केअरटेकर मुलांच्या शरीराला हात लावायचे. असं देखील त्यांनी सांगितलं.
धार्मिक भावनांचे शोषण केल्याचा संशय :
ग्लोबल इखवान ग्रुप लहान मुलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी आणि देणगी गोळा करण्यासाठी धार्मिक भावनांचा वापर करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. कल्याण गृहात राहणारी सर्व मुले ग्लोबल इखवान ग्रुपच्या कर्मचाऱ्यांची मुले असल्याचे तपासात समोर आले आहे. ज्यांना त्याच्या पालकांनी जन्मापासूनच कल्याण गृहात सोडले. आयजी हुसेन म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच सर्व मुलांची वैद्यकीय तपासणीही केली जाणार आहे.
धार्मिक नेते अशरी मोहम्मद यांनी केली स्थापना :
ग्लोबल इखवान ग्रुपच्या वेबसाइटनुसार, त्याची स्थापना एका धार्मिक नेत्या अशरी मोहम्मद यांनी केली होती. त्यांनी मलेशियामध्ये अल-अर्कम नावाचा धार्मिक पंथ सुरू केला, ज्यावर मलेशिया सरकारने 1994 मध्ये बंदी घातली होती. 2010 मध्ये अशरी यांच्या मृत्यूनंतर या गटाने पुन्हा प्रचार सुरू केला. अलीकडेच हा गट इस्लामिक प्राधिकरणाच्या रडारवर आला होता, असा दावा करण्यात आला होता की हा गट पुन्हा अल-अर्कम पंथाचा प्रचार करत आहे.
इखवान गटाने आरोप फेटाळून लावले :
ग्लोबल इखवान बिझनेस ग्रुपने बुधवारी एक निवेदन जारी करून बाल शोषणाचे आरोप फेटाळून लावले. तपासात अधिकाऱ्यांना सहकार्य करणार असल्याचे इखवान गटाने म्हटले आहे. निवेदनात म्हटले आहे की कंपनी कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांशी तडजोड करणार नाही, विशेषत: त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांचे लैंगिक शोषण यासारख्या प्रकरणांमध्ये.





