Mahabaleshwar News : महाबळेश्वर-पाचगणीत ‘पॅकअप’! बॉलिवूडने का फिरवली पाठ? पाहा धक्कादायक वास्तव
Mahabaleshwar News : वनविभागाच्या जाचक अटी आणि स्थानिक संघटनांच्या दादागिरीमुळे चित्रपट निर्मात्यांचा इतर राज्यांकडे ओढा; छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले.

Mahabaleshwar News – सह्याद्रीच्या कुशीत वसलेली महाबळेश्वर आणि पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे एकेकाळी बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीचे ‘फेव्हरेट डेस्टिनेशन’ होती. मात्र, गेल्या काही दशकांपासून येथील कॅमेऱ्यांचे फ्लॅश आणि ‘लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन’चा आवाज थंडावला आहे. निसर्गाचे सौंदर्य जपण्याच्या नावाखाली होणारी नाहक अडवणूक आणि तांत्रिक अडचणींमुळे निर्मात्यांनी आपला मोर्चा आता इतर राज्यांकडे वळवला असून,
याचा फटका स्थानिक रोजगार निर्मितीला बसला आहे. शुटिंग का थांबले? याची प्रमुख कारणे सांगायची झाल्यास खऱ्या निसर्गप्रेमींचा चित्रपट चित्रीकरणाला कधीही विरोध नसतो. परंतु, काही स्वयंघोषित नेते आणि अतिउत्साही संघटना शुटिंगच्या ठिकाणी जाऊन विनाकारण गोंधळ घालतात. साहित्याची नासधूस करतात किंवा खंडणीसारखी मागणी होण्याची भीती निर्मात्यांसमोर आहे.
यामुळे वैतागलेले निर्माते इकडे येण्याचे टाळत आहेत. वनविभाग आणि स्थानिक नगरपरिषदेकडून परवानगी मिळवताना निर्मात्यांच्या नाकीनऊ येतात. एक खिडकी योजना नसल्यामुळे कागदपत्रांच्या कचाट्यात शुटिंगचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड गोवा यांसारखी राज्ये चित्रपट निर्मात्यांना मोठ्या प्रमाणात ‘सबसिडी’ आणि सुरक्षा पुरवत आहेत.
महाराष्ट्रातील हक्काचे लोकेशन्स असूनही इथल्या क्लिष्ट नियमांमुळे निर्माते बाहेर जात आहेत. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि चित्रीकरणासाठी राखीव जागांचा अभाव यामुळे मोठ्या प्रॉडक्शन हाऊसला इथे काम करणे अशक्य झाले आहे.
या अगोदर पाचगणी महाबळेश्वर मध्ये हिंदी इंडस्ट्रीने मेला, धर्मात्मा, शक्ती, कारवा, बॉर्डर, गदर, तारे जमी पे, ईश्वर ,आराधना असे अनेक चित्रपट या ठिकाणी चित्रित केले आहेत. त्याचबरोबर मराठी चित्रपटाने ही महाबळेश्वर, पाचगणीला या अगोदर पसंती दिली होती. त्याचबरोबर ज्या काही टीव्हीवर चालणाऱ्या धारावीक आहेत त्यांचेही शूटिंग या पाचगणी महाबळेश्वर मध्ये मोठ्या जमाने व दिमाखात सुरू होत होते.
कोण भरून काढणार ही हानी?
जेव्हा एका मोठ्या सिनेमाचे शुटिंग येथे होते, तेव्हा केवळ हॉटेल व्यावसायिकांचाच नव्हे, तर टॅक्सी चालक, घोडेवाले, स्थानिक मजूर, सुतार, पेंटर्स, ज्युनिअर आर्टिस्ट आणि छोटे दुकानदार यांचाही मोठा रोजगार चालतो. आज हे सर्व घटक हवालदिल झाले आहेत. शुटिंग बंद झाल्यामुळे कित्येक कुटुंबांचे उत्पन्नाचे साधन हिरावले गेले आहे.
चित्रपट सृष्टीमुळे या भागाची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली. निर्माते निसर्ग नष्ट करायला येत नाहीत, तर तो जगाला दाखवायला येतात. मग अशा वेळी केवळ स्वार्थासाठी किंवा ‘दहशत’ निर्माण करण्यासाठी शुटिंग रोखणाऱ्यांवर कडक कारवाई का होत नाही? हा प्रश्न स्थानिक जनता विचारत आहे.
पुनरुज्जीवनासाठी उपाय
जिल्हाधिकाऱ्यांनी चित्रपट निर्मात्यांसाठी ‘स्पेशल डेस्क’ सुरू करून तातडीने परवानग्या देण्याची व्यवस्था करावी. शुटिंगच्या ठिकाणी विनाकारण अडथळा आणणाऱ्या समाजकंटकांवर ‘कठोर कायद्यान्वये कारवाई करून निर्मात्यांना पोलीस संरक्षण द्यावे. राज्य सरकारने महाबळेश्वर-पाचगणी परिसरात चित्रीकरण करणाऱ्या मराठी आणि हिंदी चित्रपटांना विशेष प्रोत्साहनपर सवलती द्याव्यात. पर्यावरणपूरक पद्धतीने एक छोटा स्टुडिओ किंवा ‘शूटिंग झोन’ विकसित करावा, जिथे निसर्गाला धक्का न लावता काम करता येईल.






