‘माझी बदनामी झाली ती भरून द्या’; आमदार बच्चू कडू मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी

अमरावती – भाजपशी संबंधित नेते रवी राणा यांनी माझ्यावर अत्यंत नीच पद्धतीचा आरोप केला आहे. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. तोडफोड करून या सरकार मधून बाहेर पडा असा संदेश मला माझ्या कार्यकर्त्यांनी दिला आहे, असे प्रतिपादन राज्यातील सरकारमधील एक महत्वाचे नेते बच्चू कडू यांनी केले आहे.
बच्चू कडू आणि रवी राणा या सत्तारूढ आघाडीतील नेत्यांमध्येच गेले चार पाच दिवस मोठे वाकयुद्ध सुरू आहे. नवीन सरकारला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू यांनी पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यामुळे बच्चू कडू संतप्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांना आज मुंबईत चर्चेसाठी बोलावले आहे. त्या विषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले की मला या बैठकीतून काहींही साध्य होईल असे वाटत नाही. माझी बदनामी झाली आहे, ती बदनामी भरून द्यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे. रवी राणांचा एकेरी उल्लेख करीत बच्चू कडू म्हणाले की, माझी त्यांच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही.





