Kamshet : कामशेत शहर कचरामुक्त करा; मनसेकडून ग्रामपंचायतीला दहा दिवसांची मुदत
Kamshet : अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासह पंचायत समिती कार्यालयासमोर कचरा टाकण्यात येईल, असा मनसेचा इशारा

कामशेत – शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावून शहर कचरामुक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुक्याच्या वतीने कामशेत ग्रामपंचायतीला दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून शहर स्वच्छ न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासह पंचायत समिती कार्यालयासमोर डंपरने कचरा टाकण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.
यापूर्वी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी मनसेच्या वतीने मावळच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मावळ तालुक्यासह कामशेत शहरातील कचऱ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावून शहर स्वच्छ ठेवण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली होती. मात्र, निवेदन देऊनही पंचायत समिती प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.
कामशेत शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचऱ्याची नियमित उचल आणि योग्य विल्हेवाट लावण्याबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनसेने केली आहे. दहा दिवसांत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
‘शहरातील कचऱ्याबाबत काही दिवसांपूर्वी पंचायत समितीमध्ये निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कामशेत शहर कचरामुक्त न झाल्यास पंचायत समिती, वडगाव मावळ आणि कामशेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर कचरा टाकण्यात येईल.’ – अनिल श्रीरंग लालगुडे, उपाध्यक्ष, मनसे मावळ.





