Makar Sankranti: मकरसंक्रांत हा सण म्हणजे सौभाग्य, नव्या सुरुवातीचा आणि पारंपरिक सौंदर्याचा उत्सव. ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ या गोड संदेशासोबतच महिलांच्या वेशभूषेतही या सणाला विशेष महत्त्व आहे. विशेषतः साडी हा मकरसंक्रांतीचा अविभाज्य भाग मानला जातो. बदलत्या काळानुसार साड्यांचे ट्रेंड बदलत असले तरी, पारंपरिकतेची ओढ आजही तितकीच कायम आहे. यंदा मकरसंक्रांतीनिमित्त नऊवारी, पैठणी, बनारसी आणि हातमागाच्या साड्यांना मोठी पसंती मिळताना दिसत आहे. सोनेरी काठ, मोरपिसी डिझाइन, मंदिर बॉर्डर आणि पारंपरिक बुट्टे असलेल्या साड्या महिलांच्या पहिल्या पसंतीत आहेत. विशेष म्हणजे, हलक्या वजनाच्या पण समृद्ध लूक देणाऱ्या साड्यांकडे तरुणीही आकर्षित होत आहेत. रंगसंगतीबाबत बोलायचं झालं तर पिवळा, हिरवा, जांभळा, गुलाबी आणि लाल हे रंग यंदा ट्रेंडमध्ये आहेत. मकरसंक्रांतीचा सूर्य आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून पिवळ्या रंगाच्या साड्यांना विशेष मागणी आहे. त्यासोबतच कॉन्ट्रास्ट ब्लाऊज, बेल स्लीव्हज आणि स्लीव्हलेस ब्लाऊजचा ट्रेंडही महिलांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. ग्रामीण भागात अजूनही नऊवारी साडीचा मान कायम असून, लुगडे नेसून, पारंपरिक दागिने घालून महिलांचा सणाचा साज उठून दिसतो. तर शहरांमध्ये आधुनिक टच असलेल्या पैठणी आणि सिल्क साड्या लोकप्रिय होत आहेत. अनेक महिला घरगुती हळदीकुंकू समारंभांसाठी खास साड्यांची निवड करत आहेत. एकंदरीत, मकरसंक्रांती हा सण फक्त पतंग आणि तिळगुळापुरता मर्यादित नसून, परंपरा, सौंदर्य आणि संस्कृती जपणारा उत्सव आहे. साडीच्या रूपाने ही परंपरा पिढ्यान्पिढ्या पुढे जात असून, मकरसंक्रांतीनिमित्त साड्यांचा हा साज महिलांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक उठाव देणारा ठरत आहे.