Bhogi Celebration 2026: मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा सण म्हणजे भोगी. ‘भोगी’ या शब्दाचा अर्थ आनंद घेणारा किंवा उपभोग करणारा असा होतो. त्यामुळे भोगी हा आनंद, समृद्धी आणि नव्या सुरुवातीचा सण मानला जातो. भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर आणि परिसर स्वच्छ केला जातो. दारासमोर पाणी शिंपडून, शेणाने सारवण करून सुंदर रांगोळी काढली जाते. सर्वजण अभ्यंगस्नान करून नवे कपडे घालतात. आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची परंपरा आहे. यामुळे शरीराला उष्णता मिळते आणि येणारा उन्हाळा त्रासदायक ठरत नाही, अशी श्रद्धा आहे. सासरी गेलेल्या मुली या दिवशी माहेरी येतात, त्यामुळे भोगी हा कुटुंब एकत्र येण्याचाही सण आहे. भोगी संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते. तामिळनाडूत हा सण पोंगल, आसाममध्ये भोगली बिहू, पंजाबमध्ये लोहिरी, तर राजस्थानमध्ये उत्तरायण म्हणून ओळखला जातो. दक्षिण भारतात पोंगल या चार दिवसांच्या कापणी सणाचा पहिला दिवस भोगी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुने सामान टाकून देऊन नवीन गोष्टींचे स्वागत केले जाते. धार्मिकदृष्ट्या भोगीचा दिवस पावसाचा आणि ढगांचा देव इंद्रदेव यांना समर्पित मानला जातो. शेतकरी चांगल्या पिकासाठी, संपन्नतेसाठी इंद्रदेवाची प्रार्थना करतात. काही भागांत हा दिवस ‘इंद्रन’ म्हणूनही ओळखला जातो. शेतकरी आपल्या नांगराची आणि शेतीच्या अवजारांची पूजा करतात. काही प्रदेशांत भोगीच्या दिवशी लहानशी होळी पेटवून जुने कपडे, चटया, झाडू यांची आहुती दिली जाते. याला जुन्या गोष्टींचा त्याग करून नव्या पर्वाची सुरुवात मानले जाते. महिलांद्वारे तांदळाच्या पिठाची ‘कोलम’ रांगोळी काढली जाते आणि मातीचे दिवे लावले जातात. महाराष्ट्रात भोगीच्या दिवशी खास भोगीची भाजी केली जाते. हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, वाटाणा, शेंगदाणे, फ्लॉवर अशा सर्व हंगामी भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते. त्यासोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी केली जाते. बाजरी आणि तीळ उष्ण असल्याने हिवाळ्यात शरीराला ऊर्जा देतात, अशी समजूत आहे. एकूणच भोगी हा स्वच्छता, कृतज्ञता, परंपरा आणि आनंदाचा सण आहे. शेतकऱ्यांसाठी तो विसाव्याचा आणि नव्या आशेचा दिवस मानला जातो, तर कुटुंबासाठी एकत्र येऊन सण साजरा करण्याची सुंदर संधी असते.