107 वर्षांनंतर घडणार! 2026 मध्ये तिहेरी गुरुवारी योग; जाणून घ्या काय आहे खास

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – २०२६ हे वर्ष पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण देशासाठी आगळेवेगळे ठरणार असल्याचा अंदाज ज्योतिष क्षेत्रात व्यक्त केला जात आहे. आगामी वर्षाची सुरुवात, वर्षाचा समारोप आणि हिंदू नवीन वर्षाची सुरूवात म्हणजेच गुढीपाडवा, हे तीनही महत्त्वाचे टप्पे गुरुवारीच येत असल्याने हा तिहेरी योग अत्यंत दुर्मिळ व विशेष मानला जात आहे.
एक जानेवारी २०२६ रोजी वर्षारंभ गुरुवारी होत असून २०२६ या वर्षीचा ३१ डिसेंबरचा शेवटचा दिवसही गुरुवारच आहे. याशिवाय प्रतिपदा क्षयतिथीमुळे गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षारंभ १९ मार्च रोजी आणि तोही गुरुवारच्याच दिवशी साजरा होणार आहे. वर्षभरात तिहेरी गुरुवारी योग जुळून आल्याने धार्मिक दृष्ट्या हे वर्ष विशेष मानले जात आहे.
बारा दिवसांचा गणेशोत्सव
येत्या वर्षात गणेशभक्तांसाठीही आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सव बारा दिवस साजरा करण्याची संधी मिळणार असून गणेश चतुर्थी व हरितालिका तिथी १४ सप्टेंबरला एकाच दिवशी येत आहे. २० ऑक्टोबर रोजी दसरा साजरा होईल; मात्र विजयमुहूर्त अवघा ४६ मिनिटांचा राहील. दिवाळी सणातील नरक चतुर्दशी आणि प्रदोषकाळातील लक्ष्मीपूजनही ८ नोव्हेंबर रोजी रविवारी एकाच दिवशी येणार आहे.
यंदा उन्हाळ्यात अधिक मास
दर २९ ते ३३ महिन्यांनी येणारा अधिकमास यावर्षी १७ मे ते १५ जूनदरम्यान राहणार आहे. श्रावण महिना १३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान येईल. १४ जानेवारीची संक्रांत विशिष्ट संक्रांती योगासह येत असून तिचा प्रवास पश्चिमेकडे लक्ष केंद्रीत करणारा असल्याने हवामानातील टोकाचे बदल जाणवू शकतात, असे त्यांनी सांगितले.
तीन गुरुपुष्यामृत आणि मुहूर्त
२३ एप्रिल, २१ मे आणि १८ जून अशा तीन गुरुपुष्यामृत योगांची नोंद यंदा होणार आहे. आगामी वर्षात विवाहासाठी केवळ सुमारे ४० दिवसांचे मुहूर्त उपलब्ध असतील. सिंहस्थकाळातील काही पर्यायी तिथी अडचणीच्या वेळेस उपयोगी ठरू शकतात. वास्तु तसेच मुंजसंस्कारासाठीचे मुहूर्तही मर्यादित असून अनुक्रमे २५ आणि सुमारे २० दिवसच राहणार अहोत.
चंद्र व सूर्यग्रहण
२०२६ मध्ये दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण अशा चार ग्रहणांच्या घटना घडणार आहेत. १७ फेब्रुवारीचे कंकणाकृती व १२ ऑगस्टचे खग्रास सूर्यग्रहण भारतातून न दिसणारे आहे. मात्र ३ मार्च रोजीचे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार असून २८ ऑगस्टचे खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार नाही.





