Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींची मकरसंक्रांत होणार गोड

मुंबई : विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली होती. आता महापालिका निवडणुकीतही सत्ताधारी पक्षाकडून या योजनेचा प्रचार केला जात असून येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी देवाभाऊंकडून म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट मिळणार असल्याचा दावा केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, येत्या १४ जानेवारीपूर्वी म्हणजेच मकर संक्रांतीच्या आधी राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे एकत्रित ३००० रुपये जमा करण्यात येणार आहेत.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
मंत्री गिरीश महाजन यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत लाडकी बहीण योजनेची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे. मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना दिलासा देणारी ही मोठी भेट ठरेल, असं मंत्री महाजन यांनी आपल्या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे अनेक महिलांना दैनंदिन खर्च, शिक्षण आणि आरोग्य विषयक गरजांसाठी आधार मिळतो. त्यामुळे मंत्री महाजन यांनी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे.





