Police Transfers: राज्यात पोलीस दलात मोठे फेरबदल; सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाने राज्यात चार सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. मंगळवारी २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होण्याआधीच तातडीने हे फेरबदल करण्यात आले. विधानसभा निवडणुकीदरम्यान मुंबईबाहेर बदली झालेल्या अनेक अधिकाऱ्यांना पुन्हा मुंबईत बोलावण्यात आले आहे.
बदललेल्या अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप किसनराव भागवत यांची सांगली येथे बदली करण्यात आली आहे. ठाण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत आता छत्रपती संभाजीनगर येथे रुजू होतील. तसेच, नागपूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक शेळके यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
या फेरबदलात नागपूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्त शालिनी शर्मा यांची पुन्हा मुंबईत बदली झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची मुंबईबाहेर बदली झाली होती. त्या बराच काळ मुंबई पोलिसांच्या इंटरपोल युनिटशी संबंधित होत्या.
याव्यतिरिक्त विविध पोलीस आयुक्तालयात अंतर्गत फेरबदल करण्यात आले आहे. ठाण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा पवार यांची विशेष शाखा-१ मधून ठाण्यातील आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली. वर्तकनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांची विशेष शाखेत, तर कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांची वर्तक नगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
मिरा भाईंदर, वसई, विरार पोलीस आयुक्तालयातील काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड यांची परवाना शाखेत आणि परवाना शाखेत असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांची काशिगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मांडवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांची नायगावमध्ये, तर रणजीत आंधले यांची मांडवी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली होती.





