Bhor: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नांटबी येथील शेतकरी लक्ष्मण भैरू खोपडे यांच्या गट नं. ३८५ मधील बांध पोलीस बळाचा वापर करून बेकायदेशीरपणे फोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत खोपडे यांनी १३ मार्च रोजी भोर तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, गट नं. ३८० मधील पाणंद रस्ता खुला करण्यासाठी ११ मार्च २०२६ रोजी मंडलाधिकारी आंबवडे आणि नायब तहसीलदार मॅडम पोलीस फौजफाटा आणि जेसीबी घेऊन आले. खोपडे यांनी सांगितले की, सदर पाणंद रस्ता आधीच २६ फेब्रुवारी २०२६ रोजी खुला करण्यात आला असून शासकीय मोजणीनुसार १२ फुटाचा रस्ता मान्य झाला होता. तरीही ओढ्यापासून १०० ते ११० फूट लांब बांध पोलीस बळाने फोडण्यात आला. या कारवाईत शेतजमीन, जनावरांचा चारा, जळाऊ लाकूड आणि गवऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गावातील जमीन विकत घेतलेल्या बाहेरील व्यक्तींच्या सांगण्यावरून ही बेकायदेशीर कारवाई झाल्याचा आरोप खोपडे यांनी केला आहे. नुकसानभरपाई, बांध पूर्ववत करणे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून हा अर्ज जिल्हाधिकारी पुणे, उपविभागीय अधिकारी भोर, आमदार शंकर मांडेकर आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही पाठवण्यात आला आहे.