देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार?; लालू प्रसाद-नितीश कुमार आणि सोनिया गांधींची आज दिल्लीत बैठक

नवी दिल्ली : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजपविरोधी लढण्याची तयारी करत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडणार असल्याचे दिसत आहे. कारण राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत विरोधी पक्षांना एकत्र आणण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
लालू प्रसाद यादव हे कालच दिल्लीत दाखल झाले असून नितीश कुमार हे आज दिल्लीत येणार आहेत. जवळपास पाच वर्षांपेक्षाही अधिक काळानंतर पहिल्यांदाच तिन्ही पक्षांमध्ये ही बैठक होत आहे. राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव काल पाटणाहून दिल्लीला येत होते, तेव्हा त्यांनी भाजपावर हल्लाबोल करत म्हटले की, “बिहारमधील भाजपा सरकार हटवण्यात आले आहे. २०२४ मध्ये ते देशातूनही हटवले जाईल. विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. सोनिया गांधी यांच्या भेटीचा हा अजेंडा आहे.” असे त्यांनी यावेळी म्हटले होते.
बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या महिन्यात त्यांच्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सध्याची राजकीय परिस्थिती आणि विरोधकांची एकजूट यावर चर्चा झाली. तेव्हा सोनिया गांधी त्यांच्या आईच्या निधनामुळे देशाबाहेर होत्या.
खरेतर, बिहारमध्ये आरजेडीसोबत सरकार स्थापन केल्यापासून, नितीश कुमार काँग्रेससह बिगर-भाजपा पक्षांच्या एकजुटीवर सतत जोर देत आहेत. भाजपाशी संबंध तोडल्यापासून ते राहुल गांधी, शरद पवार, अरविंद केजरीवाल आणि इतर अनेक प्रमुख नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले होत. बिहारच्या दृष्टिकोनातून या रॅलीची विशेष बाब अशी आहे की त्यात तेजस्वी यादव देखील सहभागी होऊ शकतात.




