रांजणगावात मोठी कारवाई: 4 गावठी पिस्तुले, 12 काडतुसे जप्त, रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक

रांजणगाव : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्रांविरुद्ध धडाकेबाज कारवाई केली. सोनेसांगवी (ता. शिरूर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज राजेश पाडळे याच्याकडून ४ गावठी पिस्तुले, १२ जिवंत काडतुसे आणि ३ मॅगझिन असा १ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई अवैध धंद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी गस्तीवर असताना झाली.
कशी झाली कारवाई?
२६ मार्च २०२५ रोजी गुप्त बातमीदाराने सूरजकडे अवैध पिस्तुले असल्याची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन पंचांसह सोनेसांगवीत त्याच्या घरी छापा मारला. चौकशीत सूरजने सांगितलं की, त्याने आणि त्याचा मित्र संकेत संतोष महामुनी (रा. सरदवाडी) यांच्यासह तिघांनी मध्यप्रदेशातून चार पिस्तुले, काडतुसे आणि मॅगझिन खरेदी केले. सूरजने स्वतःकडील एक पिस्तूल आणि मित्रांनी ठेवलेली तीन पिस्तुले पोलिसांना दिली. यानंतर त्याच्यासह तिघांवर रांजणगाव MIDC ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला.
अटक आणि तपास
सूरजला शिरूर न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला २ एप्रिल २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली. स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवाजी मुंढे पुढील तपास करत आहेत. सूरज आणि संकेत हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वी आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हे आहेत.
यावर्षीची कामगिरी
स्थानिक गुन्हे शाखेने २०२५ मध्ये आतापर्यंत ७ गावठी पिस्तुले आणि १७ काडतुसे जप्त केली आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पुणे ग्रामीण जिल्हा तपासणी दरम्यान ही कारवाई झाली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पथकाचं कौतुक करत अभिनंदन केलं.
कारवाईचं नेतृत्व
ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक दत्ताजीराव मोहिते आणि पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, अमोल शेडगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.





