भूगर्भात घातक हालचालीमुळे काही दिवसांत भूकंपाचे मोठे धक्के बसण्याची शक्यता; भूगर्भ शास्त्रज्ञांचा इशारा

हैदराबाद – भारतीय टेक्टोनिक प्लेट भाग दरवर्षी 5 सेमीने सरकत आहे. त्यामुळे हिमालयाच्या बाजुला मोठा ताण निर्माण होत आहे, त्यातून भुगर्भात मोठ्या घातक हालचाली होत आहेत आणि त्यातून येत्या काही दिवसांत भूकंपाचे मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे असे भाकित एका अग्रगण्य भुगर्भ शास्त्रज्ञाने केले आहे.
डॉ. एन पूर्णचंद्र राव असे त्यांचे नाव असून ते हैदराबादस्थित नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्य शास्त्रज्ञ आणि भूकंपशास्त्रज्ञ आहेत. मंगळवारी एएनआयशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, “पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविध प्लेट्स आहेत ज्या सतत गतीमध्ये असतात. भारतीय पठार दरवर्षी पाच सेमीने फिरत आहे. परिणामी हिमालयाच्या बाजूने तणाव जमा होतो आणि त्यातून मोठ्या भूकंपाची शक्यता वाढते आहे असे ते म्हणाले.
“आमच्याकडे उत्तराखंडमध्ये 18 सिस्मोग्राफ स्टेशनचे मजबूत नेटवर्क आहे. उत्तराखंडसह हिमाचल आणि नेपाळचा पश्चिम भाग भूकंपीय भाग म्हणून ओळखला जातो तेथे कधीही भूकंप होण्याची शक्यता आहे,” असे ते म्हणाले. सोमवारी रात्री हिमाचल प्रदेशातील धरमशाला जवळ भूकंपाचा धक्का बसला होता. या भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली 10 किलोमीटर खोलीवर होते. काल रात्री सुमारे 10:38 वाजता हिमाचल प्रदेशच्या धर्मशालाच्या 56 किमी उत्तरेस 3.6 तीव्रतेचा भूकंप झाला.





