महाराष्ट्राला हादरा..! हिंगोली जिल्ह्यात सलग तीन भूकंपाचे धक्के, नागरिक भयभीत

Hingoli earthquake : महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी तालुक्यांना रविवारी (दि. २६) दुपारच्या सुमारास भूकंपाच्या धक्क्यांनी हादरवले. दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांनी सिंदगी, गिरगांव, टोकाई, कोठारी, आखाडा बाळापूर, वारंगा, बोल्डा, जांब, पांघरा शिंदे आणि येहळेगाव गवळी यांसारख्या अनेक गावांमध्ये सलग तीन भूकंपाचे धक्के जाणवले.
या अचानक कंपनामुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले, आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी नुसार, हा भूकंप रिक्टर स्केलवर ३.९ च्या तीव्रतेचा होता, ज्याचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातच ५ किलोमीटर खोलीवर होता.
स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, पहिला धक्का काही सेकंद जाणवला, त्यानंतर लगेच दोन सौम्य धक्के बसले. या भूकंपामुळे काही घरांच्या भिंतींना किरकोळ तडे गेल्याची नोंद आहे, पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठी हानी झाल्याची माहिती नाही. केंद्रबिंदू सिंदगी जवळील ग्रामीण भागात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा, दांडेगाव, वारंगा फाटा बाळापूर दिग्रस, जवळा पांचाळ यांसारख्या भागातही दुपारी ३.३७ वाजता सौम्य धक्का जाणवला. मागील वर्षी (ऑक्टोबर २०२४) याच भागात दोन सौम्य भूकंप झाले होते, तर शनिवारी (दि. २५) दुपारसुद्धा गुड आवाजासह धक्का जाणवला होता. या घटनांमुळे गावागावांत भूकंपाच्या चर्चा सुरू झाल्या असून, ग्रामस्थ रस्त्यावर भयभीत अवस्थेत दिसत आहेत.
मागील महिन्यांपासून रामेश्वर तांडा हा भूकंपाचा केंद्रबिंदू मानला जात होता, पण ऑक्टोबर २०२४ मध्ये तो हदगाव तालुक्यातील सावरगाव येथे सरकला होता, जेव्हा ३.८ ची तीव्रता जाणवली होती. आजच्या धक्क्यातही कर्कश्य आवाज मोठ्या प्रमाणात ऐकू आल्याचे रहिवासी सांगत आहेत. हिंगोली जिल्हा भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.





