Dhruv Rathee : मोठी घडामोड! ध्रुव राठीला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात; CJP कडून पोस्ट, जंतर मंतरवरही धरपकड
Dhruv Rathee : अशातच प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ध्रुव राठी यालाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा CJP च्या सोशल मीडिया पोस्टमधून करण्यात आला आहे.

Dhruv Rathee : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या (SIR) विरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात आज (१० ऑक्टोबर) आंदोलन करण्यात येत आहे.
कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि काही विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनासाठी पुढाकार घेतला असून, अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. अशातच प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ध्रुव राठी यालाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा CJP च्या सोशल मीडिया पोस्टमधून करण्यात आला आहे.
ध्रुव राठीला ताब्यात घेतल्याचा CJP चा दावा
CJP च्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, गुरुग्राममधील ध्रुव राठीच्या निवासस्थानी सकाळी सुमारे ८ वाजता साध्या वेशातील जवळपास ५० पोलीस कर्मचारी पोहोचले होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
“हुकूमशहाला अशा तरुणांची प्रचंड भीती वाटते, जे त्याच्या चुकीच्या कृत्यांवर प्रश्न उपस्थित करतात आणि गप्प राहण्यास नकार देतात,” असेही पोस्टमध्ये म्हटले आहे.
Dhruv Rathee has been detained.
The Dictator is TERRIFIED of young people who question its wrongdoings and refuse to stay silent!
— Cockroach Janta Party – CJP (@Cockroachisback) October 10, 2026
‘चलो जंतर-मंतर’चा नारा; अभिजीत दिपके दिल्लीत दाखल
CJP ने पुन्हा एकदा ‘चलो जंतर-मंतर’चा नारा दिला आहे. आंदोलनासाठी राजधानी दिल्लीत जाण्याची भूमिका संघटनेने घेतली असून, CJP प्रमुख अभिजीत दिपके दिल्लीत दाखल झाले आहेत. या आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली; तरीही आंदोलनाच्या भूमिकेवर CJP ठाम आहे.
दिल्लीमध्ये कडेकोट बंदोबस्त
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. जंतर-मंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग करण्यात आले असून, आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
दिल्लीतील ५७ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत. तसेच देशाच्या विविध भागांतून दिल्लीकडे येणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. वाहतूक कोंडी आणि सुरक्षेच्या कारणांमुळे हे निर्णय घेण्यात आला आहे.
५०० आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती
समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी सुमारे ५०० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी जवळपास ५० जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सांगितले जात आहे.





