नाशकात कृषी विभागाची मोठी कारवाई; 3 हजार 600 हेक्टर क्षेत्राचा बोगस पिक विमा रद्द

नाशिक – जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा रद्द करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. बोगस पिक विमा उतरवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात 5 हजार 172 शेतकऱ्यांनी 3 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर बोगस पिक विमा उतरवल्याचे समोर आले आहे.
यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पिकाची लागवड केलेली नसतानाही त्या ठिकाणच्या क्षेत्रावर पिक विमा काढल्याचे समोर आले. अशा बोगस विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्यात येणार आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात बोगस वीमा भरल्याचे समोर आले आहे.
शेतातील पिकांचे नैसर्गिक संकटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येऊ नये, यासाठी सरकारने एक रुपयात पीक विमा योजना सुरु करत शेतकऱ्यांच्या पिकांना एक प्रकारे सुरक्षा कवच दिले आहे. परंतु, यात काही शेतकऱ्यांकडून बनवाबनवी करत सरकारची फसवणूक केल्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यातून समोर आला आहे.
कृषी विभागाने केलेल्या पडताळणीनंतर नाशिक जिल्ह्यात 5 हजार 172 शेतकऱ्यांनी 3 हजार 600 हेक्टर क्षेत्रावर बोगस पिक विमा उतरवल्याचे समोर आले. कमी क्षेत्रावर लागवड झालेली नसल्याचे शेतकऱ्यांनी न कळवल्याने ही बाब समोर आली.
कांदा उत्पादकांचा आकडा जास्त
बोगस पिक विमा उतरवणाऱ्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आकडा सर्वाधिक असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे कृषी विभागाने विमा कंपन्यांना बोगस पिक विमा उतरवल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नाशिकचे उपसंचालक कृषी अधिकारी यांनी सांगितले आहे.





