भोर नगरपालिकेची मोठी कारवाई; नॅशनल हायवेसाठी ‘या’ भागातील अतिक्रमणे जमीनदोस्त होणार?

प्रभात वृत्तसेवा
भोर – भोर नगरपालिकेच्या हद्दीत भोर – महाड रस्त्यावर रामबाग ते महाड नाका या दरम्यान अतिक्रमणे झालेली आहेत. यादरम्यान सद्यस्थितीला रस्त्याचे काम सुरू करावयाचे असल्याने मालमत्ताधारकांनी ही अतिक्रमणे लवकरात लवकर काढावीत, याबाबत भोर नगरपालिकेकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. लवकरात लवकर अतिक्रमणे काढण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग, पुणे व भोर नगरपालिकेने केले आहे.
शिंदेवाडी फाटा (ता खंडाळा) ते वरंधा घाट हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. या रस्त्याच्या उन्नतीकरण व मजबूतीकरण यात मोऱ्यांची कामे, साईट पट्ट्या, खडीकरण, काँक्रिटीकरण ही कामे सद्यस्थितीला प्रगतीपथावर आहेत. नागरी व औद्योगिक भागात इमारत रेषा तसेच नियंत्रण रेषा रस्त्याच्या हद्दीपासून ३ मीटर ते ६ मीटरवर असणे बंधनकारक आहे.
त्या अनुषंगाने भोर नगरपरिषद हद्दीतील रामबाग ते महाड नाका या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरांचे कट्टे, दुकान शेड, गाळे यांचे अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले आहे.या अतिक्रमणांमुळे रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याने अतिक्रमण काढणे गरजेचे आहे.
दरम्यान ही अतिक्रमणे काढण्याबाबत ७० ते ८० मालमत्ताधारकांना भोर नगरपालिकेकडून नोटीस बसवण्यात आली आहे. नोटीस मालमत्ताधारकांना पोहोच झाल्यापासून ८ दिवसांच्या आत अतिक्रमणे काढून घेण्यात यावीत, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणेचे उपअभियंता राहुल कुलकर्णी व भोर नगरपालिकेचे मुख्यधिकारी गजानन शिंदे यांनी केले आहे.
अतिक्रमण काढून न घेतल्यास अथवा या कामामध्ये कोणतीही टाळाटाळ केल्यास आपणावर महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १७९ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ ते ५५ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे व भोर नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शिंदेवाडी फाटा (ता.खंडाळा) ते भोर हद्दीतील वरंध घाटापर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. भोर नगरपालिका हद्दीत असलेल्या रामबाग ते महाड नाका दरम्यानची अतिक्रमणे नागरिकांनी स्वतःहून काढून घ्यावीत आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे उपअभियंता राहुल कुलकर्णी यांनी केले आहे.
सुमारे ८० मालमत्ताधारकांना नोटीसा
याबाबत मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले की, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे यांनी भोर नगरपालिकेला भोर – महाड रस्त्यावरील भोर शहरातील असलेले अतिक्रमण काढण्याबाबत पत्र दिले होते. त्यानुसार भोर शहरातील ७० ते ८० मालमत्ताधारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.





