Kangana Ranaut : 13 कोटींच्या Rolls-Royce मधून मैथिली ठाकूर लालबागच्या दर्शनाला येताच ट्रोल; कंगना रणौतने ट्रोलर्सना दिलं उत्तर, “काही लोकांचा जळफळाट होतो..”
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मैथिली ठाकूर आलिशान 'Rolls-Royce Cullinan' मधून पोहोचल्या आणि त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Kangana Ranaut | Maithili Thakur – अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. यावेळी कारण ठरलं आहे ते म्हणजे बिहारच्या तरुण आमदार आणि लोकप्रिय लोकगायिका मैथिली ठाकूर.
मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मैथिली ठाकूर आलिशान ‘Rolls-Royce Cullinan’ मधून पोहोचल्या आणि त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या महागड्या गाडीवरून प्रश्न उपस्थित करत त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. या टीकेनंतर कंगना रणौत यांनी थेट ट्रोलर्सनाच खडे बोल सुनावले आहेत.
मैथिली ठाकूरच्या कारची जोरदार चर्चा
मैथिली ठाकूर या बिहारमधील अलीनगर मतदारसंघाच्या आमदार आहेत. नुकताच मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान त्यांचा लालबागच्या राजाच्या दर्शनाचा व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये त्या निळ्या रंगाच्या, चालकासह आलेल्या Rolls-Royce Cullinan मधून उतरतानाचा दिसत आहेत.
नेटकऱ्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या महागड्या कारच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील घोषित मालमत्तेचा संदर्भ देतही काही जणांनी सोशल मीडियावर चर्चा केली.
मैथिली ठाकूर यांच्यावर सोशल मीडियावर टीका सुरू झाल्यानंतर कंगना रणौत यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्यांची बाजू घेतली. राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तींनी चांगलं आयुष्य जगणं चुकीचं का मानलं जातं, असा सवाल कंगनाने केला.
कंगना यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटल की, काही लोकांना राजकारणी चांगलं आयुष्य जगताना दिसले की त्याचा त्रास होतो. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या करिअरचा, आयुष्याचा आणि लोकप्रियतेचा अधिकार आहे. समाजसेवा करणं म्हणजे कायम साधं किंवा गरिबीसारखं आयुष्य जगणं असा अर्थ होत नाही, असं कंगनाने म्हटलं.
कंगना यांनी पुढे असा सवाल केला की, सार्वजनिक जीवनात काम करणारे लोक स्वतःच्या मेहनतीने यशस्वी झाले असतील, तर त्यांनी त्या यशाचा आनंद घेण्यात गैर काय? समाजासाठी काम करणं आणि स्वतःचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगणं या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमधून अधोरेखित केलं.






