Mahua Moitra Row : महुआ मोइत्रांसाठी अधीर रंजन चौधरी आले धावून; लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

Mahua Moitra Row : तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याच आरोपाच्या पार्श्वभूमीवर मोईत्रा यांची सभागृहातून हकालपट्टी करण्याची शिफारस करणारा लोकसभेच्या नीतिशास्त्र समितीचा अहवाल येत्या सोमवारी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात मांडला जाणार आहे. त्या अगोदरच काँग्रेसकडून समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्याची मागणी केली आहे.
लोकसभेतील काँग्रेस नेते आणि पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. पत्रात चौधरी यांनी,’सभागृहातून हकालपट्टीची कारवाई ही मोठी शिक्षा आहे. महुआ विरुद्ध कारवाई करताना मानक कार्यप्रणालीचे पालन केले गेले आहे का आणि पैशाच्या वसुलीसाठी मनी ट्रेल स्थापित केला गेला आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
काय कारवाई होणार?
लोकसभा सचिवालयाने प्रसारित केलेल्या अजेंडा पेपरनुसार, आचार समितीचे अध्यक्ष विनोद कुमार सोनकर समितीचा अहवाल सभागृहात मांडतील. 9 नोव्हेंबर रोजी समितीने सहा-चार बहुमताने महुआला पैसे घेतल्याच्या आणि प्रश्न विचारल्याच्या आरोपावरून लोकसभेतून हकालपट्टी करण्याची शिफारस करणारा अहवाल स्वीकारला होता. याची अंमलबजावणी झाल्यास महुआचे संसद सदस्यत्व जाऊ शकते.
दरम्यान, विरोधी पक्षाच्या खासदारानेही महुआवरील कारवाईचे समर्थन केले होते. विरोधी पक्षांच्या चार खासदारांनी असहमती दर्शवली, परंतु काँग्रेस खासदार प्रनीत कौर यांनी मोईत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या बाजूने मतदान केले.त्यामुळे परनीत यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे.




