प्रभात वृत्तसेवा माथेरान – खोपोली, माथेरान, उरण आणि कर्जत या चार महत्त्वपूर्ण नगरपरिषदांच्या आगामी निवडणुकांसाठी आमदार महेंद्र थोरवे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने थोरवे यांच्यावर दाखवलेला विश्वास ही त्यांच्या नेतृत्वक्षमता, संघटनकौशल्य आणि जनसंपर्कातील प्रभावी कार्यशैलीची दाद असल्याचे मानले जात आहे.कर्जत, माथेरान परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे आणि पक्षविस्तारामुळे त्यांची मजबूत छाप निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांना जोडून ठेवणे, गटबाजी टाळून संघटन उभे करणे आणि निवडणुकीतील रणनीती आखणे यामध्ये त्यांचा हातखंडा असल्याने ही नियुक्ती विशेष महत्त्वाची ठरली आहे. चारही नगरपरिषदांच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या मानल्या जात असून, संघटन मजबूत करणे, बूथ पातळीवर कार्यकर्त्यांना दिशा देणे, स्थानिक प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे आणि प्रभावी निवडणूक व्यवस्थापन उभारणे ही महत्त्वाची जबाबदारी आता थोरवे यांच्या खांद्यावर आहे. नियुक्तीची घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, तुमच्या नेतृत्वाखाली माथेरान नगरपरिषदेवर भगवा फडकवू, अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. माथेरानमध्ये विकासकामे, पर्यावरण संतुलन, पर्यटनवाढ आणि स्थानिक रोजगार निर्मिती हे महत्त्वाचे मुद्दे ठरले असून अनुभवी नेतृत्वाची गरज व्यक्त होत होती. थोरवे यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, जनतेचा विश्वास जिंकून नगरपरिषदांमध्ये विकासाचा मार्ग मोकळा करू, असा विश्वास व्यक्त केला.